पान:वाटचाल (Vatchal).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९४ : वाटचाल

पाहताक्षणीच दीपविणारे त्यांच्यात काही नाही. जे आहे ते नकळत मनात झिरपणारे व माणसाला कायमचे जिंकून टाकणारे आहे.
 गांजवे मास्तरांना नंतर मी जेव्हा पुन्हा पाहिले त्या वेळी आम्ही गाडीत होतो व परभणी साहित्य संमेलनासाठी चाललो होतो. मी लहान होतो. चड्डी घातलेला एक स्वयंसेवक. मी उभाच होतो. अनंतराव, गांजवे यांचे जोरजोराने हसणे व बोलणे मी पाहत होतो. माणूस बराच दिलखुलास दिसतो असा एक अंदाज मला आला. पुढे प्रतिभा निकेतन प्रशालेमध्ये मी नोकरीच्या मुलाखतीस आलो असताना माझी व त्यांची तिसरी भेट झाली. नांदेडला पुढे मला आश्चर्याचे अनेक धक्के बसणार होते. मला खुर्ची देऊन स्वतः उभेच राहणारे हेडमास्तर व अजून शिष्टाचार न कळलेला मी ! तसेच सडकेवरील फूटपाथवर बसून तासन् तास चर्चा करणारे प्राचार्य ! राजीनामा तर देऊन पाहा, घरासमोर सत्याग्रह करतो अशी धमकी देणारे सेक्रेटरी. अशी अनेक आश्चर्ये या नांदेड शहरात मला पुढे भेटणार होती. या आश्चर्याचा प्रारंभ गांजवे मास्तरांपासून झाला. मी गरजू मॅट्रिक्युलेट म्हणून नोकरीसाठी आलो होतो. पण भाषा अजून तितकीच ताठर होती. सकाळी १० वाजता मी इंटरव्हयूला हजर झालो. मुख्याध्यापक म्हणाले, आमची शाळा सकाळी साडेसात वाजता (७|| लाच) सुरू होते. आता इंटरव्यूची वेळ संपलेली आहे. मी एकदम भडकलो. श्री. गांजवे त्या वेळी विधानसभेमध्ये मुख्य प्रतोद व आमदार होते. भडकलेले माझे बोलणे त्यांनी शांतपणे ऐकले व सौम्य हसून ते म्हणाले, " हं चला, इंटरव्हयू घेऊ" आणि जातानाच त्यांनी मला सांगितले की हे सगळे नाममात्र आहे. तुम्हाला घ्यावयाचे अधीच ठरले आहे. मला मात्र हा सर्व प्रकार फारच अनपेक्षित होता. मी त्यामुळे एकदम अस्वस्थच झालो.
 सगळेच नांदेड हे असे आहे ! एखाद्यावर भाळले की भाळलेच. त्याला सारे जण सांभाळू लागतात. सांभाळून घेतात ! ज्यांनी संपूर्ण एक तप मला सांभाळण्याचे काम सतत केले आहे, त्यांपैकी गांजवे मास्तर हे एक आहेत. हे काम सोपे होते असे अजूनही वाटत नाही. गांजवे मास्तरांना व शामराव बोधनकरांना त्यासाठी फार मोठया मनस्तापातून अनेकदा जावे लागले आहे. तरीही पण गेली बारा वर्षे आता अनेक ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत. अधूनमधून लहानसहान कुरबुरी व मतभेद होतातच. ते तीव्र भाषेतही व्यक्त होतात. पण आमचे कधीही मांडण झालेले नाही की गांजवे मास्तरांचे प्रेमही कमी झालेले नाही सतत तीच प्रशांत, सौम्य समजूतदार प्रकृती ! व्यक्तीपुरता विचार न करता संस्थेचे हित-कल्याण सदा चिंतणारी तीच रीत. सार्वजनिक कार्यात व्यवहाराचा तोच नि:स्वार्थ चोखपणा. मनमोकळे हास्य. यात बदल कुठेच नाही. अगदी अलीकडे मात्र नाही म्हणायला एक बदल झाला आहे. ब्लडप्रेशरमुळे त्यांना फारसा ताण आता सहन होत नाही.