पान:वाटचाल (Vatchal).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांजवे मास्तर


माझे शैक्षणिक जीवन हैद्राबाद येथे गेले. त्यामुळे गांजवे मास्तरांचे वैभवशाली राजकीय जीवन मी प्रत्यक्ष पाहिलेले नाही. मी सन १९५५ च्या जुलै महिन्यात शिक्षक म्हणून नांदेडला आलो त्या वेळी संयुक्त- महाराष्ट्राचा लढा धुमसत होता. त्यामुळे अनेक ग्रहपूर्व- ग्रह घेऊनच मी नांदेडला आलो होतो. आजच्यापेक्षा माझा स्वभावाचा तेढा- काटेरीपणा त्या वेळी अधिक होता. मात्र मी याहीपूर्वी दुरून गांजवे मास्तर यांना पाहिले होते. ऐन पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्वत्र धामधूम चालू होती. त्या वेळी 'मराठवाडा' ऑफिसमध्ये बसून आम्ही निवडणुकांच्या निकालाचे अंदाज बांधीत होतो; तेव्हा श्री. अनंत भालेराव सहज म्हणाले,

"नांदेडहून श्री. गांजवे नक्कीच निवडून येणार." अनंतरावांचे हे उत्स्फूर्त आत्मविश्वासी उद्गार हे माझ्या अंदाजाच्या विरोधी होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत जुना रजाकार गट सर्वत्र कांग्रेसविरोधी जाणार हे निश्चित होते व नांदेड शहर हे कामगार चळवळीचे फार मोठे केंद्रच होते. इतरही अनेक कारणे होती म्हणून ही जागा विरोधी पक्षाला मिळेल, असे मला वाटे. अनंतराव म्हणाले, "तुला अजून गांजवे हे काय प्रकरण आहे हेच मुळी कळलेले नाही. ते हमखास निवडून येणार." यामुळे हा माणूस कोण, कसा आहे याकरिता काँग्रेस ऑफिसवर एक चक्कर टाकून मी पाहून आलो होतो. त्या वेळच्या त्यांच्या दर्शनाने मी फारसा प्रभावित झालो नाही.