पान:वाटचाल (Vatchal).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९२ : वाटचाल

पुस्तकात कानोले यांचे परिश्रम, त्यांची चौरस अभ्यासाची पद्धती, इतरांचे मत खोडण्यातील बारकावे, आपले मत मांडण्याची तर्कशुद्ध सूक्ष्मता या साऱ्यांचे प्रतिबिंब पडले आहे. भारतेतिहासाचा त्यांचा व्यासंग किती गाढ आहे हे या पुस्तिकेने कळू शकेल. हा गाढ व्यासंग कानोल्यांच्या लेखनात कुठेही दिसतो. अमृतानुभवावरील फुटकळ लेख जरी घेतला, तरी मूळ अमृतानुभवात प्रकरणे नव्हती. ती शिवकल्याणांनी पाडली याचे मोठे नमुनेदार विवेचन ते करतात.
 कानोले यांच्या लिखाणावर फारशी प्रतिकूल टीका कधी झाली नाही. एक तर दर वेळी नवा पुरावा मांडावयाचा, पुराव्याखेरीज फारसे लिहावयाचे नाही ही त्यांची पद्धती असल्यामुळे कानोल्यांवर प्रतिकूल टीका करणे अवघड जाते. कारण त्यांनी उजेडात आणलेला नवा पुरावा इतरांना अज्ञात असतो. दुसरे म्हणजे मराठवाड्यातील लेखकांच्या वाट्याला उपेक्षा हाच वारसा दीर्घकाळ आला आहे. कानोले याला अपवाद नाहीत.
 तात्यांच्या कार्याचे स्वरूप हे थोडक्यात असे आहे. हे कार्य करताना कुणाचेही साहाय्य फारसे त्यांना लाभले नाही. ते स्वतःला पोतदाराचे शिष्य म्हणवतात; पण गुरूचा दीर्घकाळ सहवास त्यांना लाभला असे नाही. एकलव्याप्रमाणे मातीचा द्रोण समोर ठेवून त्यांनी तप केले आहे. हे तप सिद्धीला जावे एवढे प्रेरक सामर्थ्य मूळ द्रोणात असेल कदाचित. पण तात्यांपुरते पाहायचे तर या सिद्धींत मोठा वाटा एकलव्याच्या परिश्रमाचा !