पान:वाटचाल (Vatchal).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तात्यासाहेब कानोले : ९१

कवीचे मराठवाड्याबाहेर स्थान निश्चित करावयाचे ही प्रवृत्ती फार प्रभावी आहे. नामदेव, जनावाई, वामन पंडित, मुकुंदराज अशी अनेक नावे या संदर्भात सांगता येतील. कानोले यांचे पुस्तक या प्रवृत्तींतील सर्वात प्रभावी अशा ठिकाणावर आघात करणारे आहे. इतिहासाचार्य राजवाडे हे मोठे युगप्रवर्तक, प्रतिभाशाली इतिहाससंशोधक होऊन गेले यात वाद नाही. पण कल्पनेच्या वावड्या उडवून पुरावा न मिळणाऱ्या जागा अंदाजाने भरून काढणे ही त्यांना फार मोठी सवय होती; नव्हे, तो त्यांचा चमत्कारिक असा दोष होता. नाइलाज म्हणून आग्र्याला गेलेला शिवाजी त्यांनी प्रत्यक्ष दिल्लीला भेट देऊन 'चकत्यांच्या पादशाहती'चा ' रामबोलो' करण्याचा विचार मनात बाळगणारा मुत्सद्दी ठरवला. अशाच एका लहरीत राजवाड्यांनी मुकुंदराज अंभोरचा ठरवून ठेवला. आजकाल विदर्भाची प्रवृत्ती मोठी गमतीची आहे. आपण आदिमहाराष्ट्र आहो याचा अभिमान विदर्भाचा सुटत नाही. (आणि सुटण्याचे कारण नाही. कारण विदर्भ-मराठवाडा हा पूर्वी एकजीव भाग होता. व हाच आदिमहाराष्ट्र होता, ही गोष्ट स्पष्ट आहे.) पण एकूण महाराष्ट्रात एकजीव होऊन सर्व महाराष्ट्राचे नेतृत्व आपण घ्यावे ही जिद्द त्याच्या मनात निर्माण होत नाही. उलट आपले आपण वेगळे राहिलो तर बरे, असेच त्याला वाटत राहते. राजवाड्यांनी कारण नसताना मुकुंदराज अंभोरला नेऊन बसवला. गेल्या अनेक वर्षांत वैदर्भीय पंडितांनी मोठ्या आपुलकीने व अभिमानाने मुकुंदराज आमचा ही भूमिका मनात बाळगली आहे. दुर्दैवाने ऐतिहासिक सत्य यापेक्षा निराळे आहे. मुकुंदराजांच्या विदर्भात आढळणाऱ्या मठ-परंपरा अर्वाचीन असून नांदेडहून 'वैतुल गॅझीटियर' निघेपर्यंत म्हणजे १९०९ पर्यंत मुकुंदराज अंभोरचे होते, असे कुणीच म्हटलेले नाही. 'कमळेश्वर मंदिरा'तील कागदपत्रे बनावट आहेत. मुकुंदराजांची जुनी शिष्यपरंपरा मराठवाड्यात असून, मुकुंदराज अंबेजोगाईचे ही भूमिका परंपरेत एकमुखाने इतकी दृढ आहे की, विदर्भातील उद्धवसुतसुद्धा मुकुंदराज अंबेजोगाईचे असे स्पष्ट म्हणतो. या वादातील निर्णायक पुरावा 'योगेश्वरीमाहात्म्य' आहे. या ग्रंथाचा काळ कोणता? कानोल्यांच्या मते हा काळ चौदाव्या शतकातील आहे. कृ. पा. कुळकर्णी यांनी सदर ग्रंथ पंधराव्या शतकात ओढला आहे. ते जरी क्षणभर गृहीत धरले तरी पंधराव्या शतकापासून आजतागायत मुकुंदराजांना अंबेजोगाईचे म्हणणारी परंपरा आहे. त्याचप्रमाणे भाविकांची परंपरा हा मुकुंदराजांचा मठ अंबेजोगाईस आहे. या बाबी नाकारता येणाऱ्या नाहीत. माझी अतिसावध भूमिका म्हणून मी म्हणतो, मुकुंदराज अंभोरचे खात्रीने नाहीत. अंबेजोगाईचे बहुधा असावेत. पण ही अतिसावधगिरी झाली. इतकी सावधगिरी बाळगावयाची म्हटले तर निम्मे इतिहाससंशोधन बाद गृहीत धरले पाहिजे. हर्षाच्या पूर्वीचा भारतेतिहास तर फारच संदिग्ध मानला पाहिजे. या