पान:वाटचाल (Vatchal).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९० : वाटचाल

अनेक तोतये महाराष्ट्रात होऊन गेले हे सिद्ध होते. उलट अभंगकार ज्ञानेश्वर हाच भावार्थदीपिकाकार आहे, याचा निर्णायक पुरावा मागण्याची वेळ आली आहे." तात्यांच्या सहवासात अशा अनेक खाचाखोचा रोज कळत जातात.
 कानोले यांनी 'मुक्तेश्वरांचे भावार्थ रामायण ' उजेडात आणले व परंपरागत भावनेला एक मोठा धक्का दिला. एकनाथांनी 'भावार्थ रामायण' हा ग्रंथ युद्धकांडाच्या ४४ व्या अध्यायापर्यंत लिहून संपविल्यानंतर नाथांना आपला निर्याणकाल समीप आला हे कळले. नाथांनी बाकीचा भाग पूर्ण करण्याचे काम गाववानामक आपल्या एका शिष्याकडे सोपविले व नंतर गावबाने पुढील सर्व रामायण लिहून पूर्णतेला नेले असे आज मानले जाते. पण एकनाथांचे नातू मुक्तेश्वर यांनी 'भावार्थ रामायण' पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात घेतले म्हणजे एकनाथ आपले रामायण अपूर्ण सोडून वारले व त्यानंतर ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे ते रामायण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, अशा एका प्रयत्नांपकी मुक्तेश्वराचा प्रयत्न म्हटला पाहिजे. कानोल्यांना जी प्रत सापडली त्या प्रतीत मुक्तेश्वरांचे नाव नव्हते. मुक्तेश्वर-मोरोपंत यांच्या वाङमयोदधीत आयुष्यभर मज्जन केलेल्या नांदापूरकरांनाही सदर उत्तरकाण्ड मुक्तेश्वराचे वाटले नाही, पण आता हा मुद्दा निर्णायकरीत्या सिद्ध आहे; कारण नंतर या उत्तरकाण्डाची पूर्ण प्रत इतरत्र उपलब्ध झाली.
 महानुभावीय वाङमयाशीही त्यांचा चांगलाच परिचय आहे. कवींची घराणी उजेडात आणणे हा तर कानोल्यांचा हातखंडा ! त्यांनी डिंभ कुळातील अनेक कवींची सगती गोळा करून चक्रधरसमकालीन रामदेव डिंभ व कृष्णमुनी विराटदेशे उर्फ कृष्ण डिभ यांचा सांधा जोडून दिला. महानुभाव वाङमयाच्या विवेचकांना ही संगती मोलाची वाटल्याशिवाय राहणार नाही. मध्येच त्यांनी गोरखनाथाच्या योगशास्त्रावरील आपला टीकाग्रंथ लिहिणारा एक चौदाव्या शतकातील योगमार्तडकार मुकुंदराज उघडकीस आणला आहे. राजवाडे यांच्या ज्ञानेश्वरीचा लेखक हाच असावा हे कानोल्यांचे अनुमान जरी वादग्रस्त असले तरी ज्ञानेश्वरी कोणा मुकुंदराजाने लिहिली आहे यावरून विवेकसिंधुकार मुकुंदराज ज्ञानेश्वरोत्तरकालीन होते असे मानण्याची गरज नाहीशी होते.
 कानोल्यांनी 'मुकुंदराजांची अंबानगरी कोणती ?' या शीर्षकाची पुस्तिका प्रकाशित केली आहे. व्यक्तिशा: मला स्थलनिर्णयाचे वाद अगर कालनिर्णयाचे वाद आवडत नाहीत. व्यक्तिशः माझ्या मते मुकुंदराज अंबेजोगाईचे बहुधा असावेत हे जरी खरे म्हटले तरी मुकुंदराज ज्ञानेश्वरपूर्वकालीन आदिकवी आहेत हे पटणे कठीण आहे. पण माझ्या मते या पुस्तिकेचे महत्त्व थोडे निराळे आहे. मराठी इतिहाससशोधनात, सामग्री मराठवाड्यात गोळा करावयाची व इतिहास लिहिताना