पान:वाटचाल (Vatchal).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तात्यासाहेब कानाले : ८९

नवा नाद लागू लागला. १९५४ साली हैद्राबाद संस्थानच्या इतिहासविषयक स्टेट बोर्डाचे ते सभासद नेमले गेले. तेव्हापासून पुढे द्वैभाषिकात काय अगर आजच्या महाराष्ट्र राज्यात काय ते सतत स्टेट बोर्डाचे सभासद होते. या स्थानाच्या निमित्ताने मराठवाड्याचा ऐतिहासिक आढावा वेळोवेळी त्यांना घ्यावा लागला. यातूनच शिलालेखांचा नाद त्यांचा वाढत गेला. अर्धापूरला त्यांनी एक शिलालेख उजेडात आणला. लहानसाच पण महत्त्वाचा असा हा शिलालेख आहे. भारतातील अनेक राजघराण्यांपैकी राष्ट्रकूटांचाही उगम पुष्कळच अंधारात आहे. या उगमस्थलावर प्रकाश टाकणारा असा हा शिलालेख आहे. रट्टवंश समुद्भव असे कुणी देवपाळ विक्रम व बल्लाळ या शिलालेखात उजेडात आले आहेत. हा शिलालेख म्हणजे दंतिदुर्गाच्या पूर्वी परंपरेने राष्ट्रकूटांच्या जहागिरी महाराष्ट्रात होत्या; याचा पुरावा ठरेल. अर्धापूरला संवत् ११५३ चा अजून एक शिलालेख त्यांना सापडला. हा नाद ह्यापुढे सतत वाढत जाणार अशी चिन्हे दिसू लागली. कानोले यांना, आधी जे संशोधन झाले आहे त्याच पुराव्याचे नव्याने विवेचन करण्याची आस्था वाटत नाही. त्यांच्या मते नवी माहिती उजेडात आणणे व तिच्या आधारे जर गरज पडेल तर आजची माहिती दुरुस्त करणे यावर भर देणे हे काम अधिक जिकिरीचे; पण महत्त्वाचे आहे. कधी कधी गंमत म्हणून काही माहिती ते आमच्यासमोर ठेवीत असतात. एकदा मी, कानोले व प्रा. गाडगीळ बोलत होतो. बोलण्याहून बोलणे बदलत गेले व ज्ञानेश्वरीतील एका कूटस्थळावर चर्चा सुरू झाली. तात्या म्हणाले, " थांबा ! माझ्याजवळ सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा ज्ञानेश्वरीतील दुर्बोध स्थळांचा हस्तलिखित कोश आहे. त्यांचे काय म्हणणे आहे ते पाहू." घाईघाईने तात्यांनी जुना कोश काढला. त्यात पाहिले. पण आम्हाला अडलेली जागा त्या कोशकारालाही अडलेलीच होती. कानोले म्हणाले, " चला, हे कूटस्थळ गेली दोनशे वर्षे कूटस्थळ राहिले आहे, ही नवी माहिती मिळाली." असेच एकदा ज्ञानेश्वर एक का दोन, यावर आम्ही बोलत होतो. तात्या म्हणाले, " निवृत्तिशिष्य अगर निवृत्तिसुत अशा ज्ञानेश्वराने लिहिलेल्या गीताटीकेच्या मजजवळ अनेक आवृत्त्या आहेत. कुठे ही गीता टीका पन्नास-पाऊणशे ओव्यांची, कुठे दोन-तीनशे ओव्यांची अशी असते. ज्ञानेश्वरीकार ज्ञानेश्वराचे हे ग्रंथ खासच नाहीत. याचाअर्थ ह्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या काळी अनेकांनी ग्रंथ लिहिले; व हेतुतः ज्ञानेश्वरांच्या नावावर बसवून दिले. तात्या म्हणतात, माझ्याजवळ ज्ञानेश्वरांची अशी एक गीता टीका आहे, ज्यात चुकून कर्त्याने भावार्थ दीपिकाकार ज्ञानेश्वराला मोठ्या आदराने पूर्वकवी म्हणून नमन केले आहे. आपला उल्लेख मात्र निवृत्तिसुत ज्ञानेश्वर असाच केला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर दोन आहेत हे सिद्ध करण्याचा निर्णायक पुरावा द्या,या म्हणण्याला अर्थ उरत नाही. स्वतःला ज्ञानेश्वर म्हणून घेणारे, निवृत्तिसुत म्हणविणारे असे