पान:वाटचाल (Vatchal).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८८ : वाटचाल

त्त्वाची प्रत मानली जाते. १९३७ साली पोतदार कानोल्यांच्यासाठी मुद्दाम नांदेडला आले होते. त्या प्रसंगी केलेल्या भाषणात पोतदार म्हणतात," कानोले यांना त्यांच्या संशोधनकार्याबद्दल लोक भ्रमिष्ट म्हणतात, हे ऐकूनही मला तितकाच आनंद वाटला; कारण ते चांगले कसाला उतरले आहेत अशी माझी खात्री झाली... मनुष्य वेडा तेव्हाच होतो जेव्हा त्याला जीवनातले इतर सर्व आनंद या इतिहासापुढे फिके वाटतील...काव्यशास्त्रात अनेक रस आहेत. त्यातच संशोधनाच्या या कागद-रसाचा अंतर्भाव करावा. या रसाचा आस्वाद एकटया संशोधकासच घ्यावा लागतो. उंदीर, कसर हे मात्र काहीसे समानधर्मी रसज्ञ दिसतात...माझा जीव ज्यात गुंतला आहे त्यातच त्यांचाही जीव अडकला असल्यामुळे आम्ही व ते एकजीव होणे स्वाभाविक आहे." पुढे १९४३ साली मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा पोतदार नांदेडला आले होते. या वेळी तर संमेलनाचे सूत्रधार कानोले व अध्यक्ष गुरू पोतदार असा योग जुळून आला होता.
 १९३३ सालापासून कानोले यांच्या कार्याला अजून एक कलाटणी मिळाली. योगायोगाने प्रसिद्ध महाराष्ट्र कवी वामन पंडित यांच्याशी निगडित असणारी काही कागदपत्रे उपलब्ध झाली. कानोल्यांनी याबाबतीत प्रचंड माहिती गोळा केली. मूळ वामन पंडित हे जरी आरंभस्थान असले तरी अनेक पिढयांचे त्यांचे पूर्वज, त्यांचे वंशज शेष पंडितांचा काशीपर्यंतचा दरारा, या पंडितांचे संस्कृत वाङ्मयात स्थान, स्वतः वामन, त्याचे ग्रंथ, त्याचा मुलगा रघुनाथ शेष, त्याचा ग्रंथ अशी प्रचंड सामग्री त्यांनी गोळा केली. यांपैकी शेष घराण्याच्या माहितीवर 'पोतदारगौरव' ग्रंथात एक विस्तृत लेख लिहिला. याआधी भारत इतिहाससंशोधक मंडळात, त्यावर त्यांनी व्याख्यानही दिले होते. १९३३ साली रामचंद्र महादेव आठवले व कानोले यांचा वामन पंडितविषयक वाद वृत्तपत्रांतून बराच गाजला.
 १९३५ साली अखिल भारतीय इतिहास परिषदेत त्यांनी वाचलेला विमलदेव चौहानाच्या 'प्रबोध चंद्रिके ' वरील लेख अगर धर्मनिर्णय सिंधुकार कमलाकराला समकालीन असणान्या नांदेड येथील मुद्गलभट वैद्य याच्या 'विमल बोध' या धर्मशास्त्रावरील संस्कृत ग्रंथाच्या परिचयाचा लेख. हे लेख त्या त्या विषयांतील ज्ञानात भर घालणारे, नवीन माहिती पुढे आणणारे म्हणून विद्वानांच्या प्रशंसेला पात्र ठरले.
 तात्यांचे हे संशोधन व त्याचा व्याप सारखा वाढतच गेला. आज जवळजवळ दीड हजार हस्तलिखिते त्यांच्या संग्रहात आहेत. या हस्तलिखितांत अतिशय मौलिक, वेचक अप्रकाशित असे अनेक ग्रंथ आहेत. कागदपत्रे, जुन्या सनदा यांचाही साठा त्यांच्याजवळ फार मोठा आहे. वेगवेगळ्या विषयांवर संशोधनपर असे शंभरवर लेख आजवर त्यांनी लिहिले. अशात त्यांना शिलालेखांच्या वाचनाचा