पान:वाटचाल (Vatchal).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तात्यासाहेव कानोले : ८७

आम्ही ज्या सर्वांनी मिळून वाचली ते पोटभर हसलो. कविता करणे यात ते रमले नाहीत. विद्यार्थीदशेतच 'गोदावरीमाहात्म्य' व स्थानिक नांदेडचे स्थल-माहात्म्य यांच्या आधारे ' नांदेड क्षेत्राचा पूर्वेतिहास' हा लेख त्यांनी लिहिला. विद्यार्थीदशेत लिहिलेल्या या लेखातील मांडणीचा चटकदारपणा आजही त्या लेखाला वाचनीय ठरवील. पण तात्यांची प्रतिभा त्या वेळी बाल्यात होती. आज ते जसे काटेकोर व तोलून लिहितात तसा प्रकार त्या वेळी नव्हता. त्यांचा पहिला लेख इतकेच त्या लेखाचे महत्त्व ! पण पुढच्या काळात तात्यांनी सारे काही उकरून काढले. नांदेडच्या संतपरंपरेवर; संस्कृत पंडितांच्या वाङमयावर; आजूबाजूला असणाऱ्या कंदकूर्ति देगलूर, वस्मत, कंधार, उमरी येथील धार्मिक मठांच्या मूळ सत्पुरुषांवर; त्यांच्या वाङमयावर तात्यांनी खूप लिहिले आहे. न लिहिलेली माहिती तर त्यांनी इतकी गोळा केली आहे की, त्या आधारे मराठवाड्यातील गेल्या दोन-तीनशे वर्षातील सत्पुरुषांच्या चरित्रांचा एक कोश सहजच निघू शकेल.
 लवकरच त्यांचे लक्ष नांदेडच्या गुरुद्वाराकडे वळले. शिखांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंह यांचे समाधिस्थान नांदेडला असल्यामुळे असे होणे स्वाभाविक होते. निजामी राजवटीच्या खाली असणाऱ्या कुणालाही हिंदू धर्मरक्षणाच्यासाठी शिखांच्या ज्या धर्मगुरूंनी आपले प्राण पणाला लावले, त्यांच्याविषयी आत्मीयता वाटणे स्वाभाविक होते. दुर्दैवाने मराठीत शिखांच्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. मराठ्यांच्या इतिहासातच आम्ही इतके गुरफटून गेलो आहोत की, ज्यांनी शे-सव्वाशे वर्षे बलिदानपूर्वक पंजाबात हिंदू धर्म टिकवला, त्या शिखांच्याकडे आमचे फारसे लक्ष वळलेच नाही. तात्यांनी त्यांना उपलब्ध झालेले सर्व प्रकाशित साहित्य अभ्यासून याखेरीज गुरुद्वारात उपलब्ध झालेले विपुल साहित्य अभ्यासून गुरुगोविंदसिंहाचे चरित्र लिहिले. १९२७ साली ' चित्रमयजगता' तून हे चरित्र प्रकाशित झाले आहे. गुरू गोविंदसिंहाचे मराठीत लिहिलेले इतके विस्तृत व अभ्यासपूर्ण असे हे पहिलेच चरित्र म्हणता येईल. यानंतरच्या काळात त्यांनी गुरुद्वारचाही सविस्तर इतिहास १९३१ साली ' चित्रमयजगता'तून लिहिला आहे. हळूहळू त्यांच्या संशोधनाचा व्याप वाढू लागला. जुने ग्रंथ शोधणे, त्यावर अभ्यासपूर्ण टिपणे लिहिणे हा प्रश्न मौजेचा छंद होता. हळूहळू पुढे त्याला जीवनव्यापी व्यसनाचे स्वरूप आले. १९३१ साली हैद्राबादेस ज्ञानकोशकार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली जे महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले होते, त्या प्रसंगी आपल्याजवळील जुन्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचा एक विभागच कानोल्यांनी मांडला होता. येथेच त्यांची व दत्तोपंत पोतदारांची भेट झाली व ते पोतदारांचे एकनिष्ठ व अभिमानी शिष्य बनले. याच संमेलनात कानोल्यांनी ज्ञानेश्वरीची एक जुनी प्रत पुढे ठेवली, हीच प्रत पुढे नांदेड प्रत म्हणून संशोधकांत प्रसिद्ध झाली. ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतीत नांदेड प्रत ही एक मह-