पान:वाटचाल (Vatchal).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८६ : वाटचाल

धूर्तपणा त्यांना जमत नाही, अहंता त्यांच्याजवळ आहे की नाही, सांगता येत नाही. पण ती प्रकट करणे त्यांना जमत नाही. तसे ते भोळे आणि भिडस्त आहेत. मात्र त्यांचे तुमचे सूत जमले पाहिजे. म्हणून वर मुद्दाम त्यांचे-माझे बरेच जुळले आहे हा उल्लेख केला. नांदेडला असलो म्हणजे त्यांच्या सहवासात तास-दोन तास घालविल्याखेरीज कधी परतत नाही. सांगण्याजोग्या सहस्र आठवणी मनात आहेत. पण तो मोह आवरला पाहिजे.
 तात्यांचे पूर्ण नाव विश्वेश्वर अंबादास कानोले असे आहे. चार ऑगस्ट १९०५ ला जुन्या वैदिक घराण्यात त्यांचा जन्म झाला. पन्नास वर्षांपूर्वी होऊन गेलेले तात्यांचे आजोबा विश्वेश्वर ऊर्फ भटजी यांच्या विद्धत्तेचा लौकिक दूरवर पसरलेला होता. त्यांचे वडीलही दशग्रंथी होते. भटजी या नावानेच अंबादास कानोले ओळखले जात. ते वैदिक पंडित असले तरी नशिबाच्या व व्यापारादी साधनांच्या बळावर फार मोठा पैसा त्यांनी कमावला. तात्यांचे बालपण चांगले श्रीमंतीत गेले. पण भटजींची ही परिस्थिती शेवटपर्यंत राहिली नाही क्रमाने दैवाचे फासे उलटले. वडिलांचे छत्र डोक्यावर होते तोवर श्रीमंती असो, गरिबी असो घरचा भार वडिलांवर होता. हे छत्रही दीर्घकाल तात्यांच्या डोक्यावर होते. तात्या जवळजवळ चाळिशीत आल्यावर वडील वारले. वडील जोवर होते; तोवर चिंतेचे कारण नव्हते. तात्यांनी व्यवसाय असा केलाच नाही. लहानपणापासून जुने ग्रंथ त्यांनी शोधले. इतिहासाचा व्यासंग केला. मराठवाडाभर ग्रंथ मिळवण्यासाठी पायपीट केली. वडिलांच्या नंतर नोकरी करण्याचे वय राहिले नव्हते. प्रतिकूल परिस्थितीत तात्या आपल्या कामात गर्क राहिले. जीवनाचा फार मोठा दैन्यपूर्ण इतिहास त्यांच्या शरीरावरून ओघळून गेला. त्यांचे ठसे वेषावर, घरावर कुठेही दिसतात. मन मात्र जे एकदा भूतकाळात जाऊन बसले त्याच्यावर वर्तमानकालीन चितांचा ठसा फारसा उमटलेला नाही. आपल्या जीर्ण बैठकीत मोडक्या पेटीसमोर तात्या सचिंत बसून असतात. चिंता कसली म्हणाल ? तर वामन पंडिताचा आजा, वामन अनंत शेष आदिलशाहीच्या शाही ग्रंथालयाचा रखवालदार होता हे खरे, की 'क्युरेटर ' होता हे खरे ? घराची चिंता दोनशे वर्षे मागे गुंतलेल्या मनाला जाणवतच नाही.
 तात्या शिकले फारसे नाहीत. कसेबसे उर्दू माध्यमातून मॅट्रिकच्या वर्गापर्यंत गेले. त्यांचे आजचे इंग्रजी पाहता हे खरे वाटत नाही, पण हा इंग्रजीचा व्यासंग इतिहासाच्या अभ्यासाचे उत्तरकालीन उपांग आहे. तसे त्यांना चांगलेच संस्कृत येते. फारसीही बऱ्यापैकी येते. पण याना शालेय शिक्षणाशी संबंध नाही. विद्यार्थीदशेतच जुन्या मराठी वाङमयाची व इतिहासाची त्यांना गोडी लागली. कोणे एकेकाळी तात्या कविता करीत हे आज सांगितले तर कोणाला खरे वाटणार नाही, मंदारमालेच्या एका जुन्या अंकात तात्यांची एक कविता परवा वाचली. आणि