पान:वाटचाल (Vatchal).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तात्यासाहेब कानोले : ८५

मराठवाड्याचा इतिहास यांचे परिश्रमपूर्वक संशोधन करून तो अमोल ठेवा जनतेसमोर घवघवीतपणे ठेवण्याचे आवश्यक आणि महत्त्वपूर्ण कार्य कानोले गेली अनेक वर्षे करीत आहेत. केव्हाही जा, संशोधनाची एक तंद्री त्यांना लागलेली दिसून येते. त्या पलीकडे त्यांना जीवन नाही. परवाच पंजाबात एका महानुभावाने लिहिलेले भगवद्गीतेचे सचित्र छोटेखानी भाषांतर ते मला मोठ्या कौतुकाने दाखवीत होते. त्यांच्या सहवासात बसले म्हणजे माणूस मोठ्या झपाट्याने मधली दीडशे वर्षे विसरून जातो व त्या आधीच्या वाङमयीन जीवनाची चित्रे डोळ्यांसमोरून तरळू लागतात. संशोधकांची माहिती जनतेला करून द्यावी लागते. प्रसिद्धीचे वलय इतिहाससंशोधकाच्या भोवती कधीच नसते. ही स्थिती दुर्दैवाची असली तरी ते एक कटू सत्य आहे. गेली अनेक वर्षे माझे आणि कानोल्यांचे बरेच जुळले आहे. साऱ्या संशोधकांना असणाऱ्या काही खोडी त्यांनाही आहेत, हे मी ओळखून आहे. साधी गोष्ट सांगतो. संशोधनातला एक महत्त्वाचा नियम असा की, 'सामग्री' कुठे आहे याचा पत्ता कुणाला द्यायचा नाही. कोण आपल्या आधी जुने ग्रंथ हस्तगत करील याचा नेम नसतो. हे वळण कानोल्यांच्या अंगवळणी इतके पडले आहे की, त्यांना केव्हाही विचारा हमखास जागेचे नाव वगळून दिशेचे नाव ते सांगतील. ' काय कानोले! कुठे निघालात ?' कानोले निघालेले असतात बाजारात भाजी आणण्यासाठी. पण त्यांच्याच्याने हे सांगणे होणार नाही. एक गोल उत्तर लगेच देतील. " असाच निघालो होतो वायव्येला. अनेकांना या उत्तराचा राग येतो. मला एकदम उचंबळून आल्यासारखे होते. काय माणूस हा ! संशोधनाच्या खेरीज याला जणू दुसरे जीवन नाही; असे वाटू लागते. कधी कधी त्यांच्या या स्वभावामुळे माणूस मोठा अडचणीत सापडतो. एकदा एका कवीलाच त्यांनी चक्क संशोधक म्हणून बोलावयास सुरुवात केली. " वा, वा, वाचलंय तर; तुमचे अशोकावरील लेख मला फार आवडले." बिचारा कविमित्र गोंधळून गेला. कानोल्यांना नावे पाठ असतात. खरे म्हटले म्हणजे, वासुदेवशास्त्री खरे, बाळताई खरे. त्यांना माहीत नाही. फार तर ग. ह. खरे. आपटे म्हटले म्हणजे, दत्तोपंत आपटे. त्यांना ह. ना. आपटे आठवत नाहीत. करंदीकर म्हटले म्हणजे अ. म., ज. स., अगर म. अ. करंदीकर. विंदा करंदीकर त्यांना ज्ञात नाहीत. असा माणूस सोबतीला थोडा कठीण जातो. एका क्षेत्रावर एकान्तिक निष्ठा. माझ्या क्षेत्रातलं बारीक सारीक विचारून घ्या, बाकी आमचा संबंध नाही, असा थोडासा वागण्याचा प्रकार आहे. त्यांच्याकडे अनेक हस्तलिखिते असतात. हस्तलिखित हरवले म्हणजे सर्वच संपले. नंतर तक्रार करून उपयोग नाही. म्हणून सामान्य पद्धत ही की, कुणाला हस्तलिखित दाखवायचेच नाही. अशा संशोधकांना असणान्या सर्व खोडी कानोल्यांना आहेतच. व्यावहारिक
 वा...६