पान:वाटचाल (Vatchal).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तात्यासाहेब कानोले


पुण्यपावन गोदेच्या परिसरात नाभिस्थानी असलेल्या नंदिग्रामाचे महत्त्व अनेकांना अनेकपरीनी वाटत असेल. वाकाटकाच्या एका ताम्रपटात 'नंदिकटकम्' असा या गावचा उल्लेख आला आहे. कानोले यांचा तर्क जर खरा मानावयाचा तर पोढ्ढण ऊर्फ बोधन येथपर्यंत नंदराज्य पसरलेले होते असे मानण्यास जागा आहे. नंद- साम्राज्याचे शेवटचे टोक म्हणून 'नंदतट' असे या गावाचे जुने नाव असावे. प्राचीन काळपासून गोदावरीचे नाभिस्थान असल्यामुळे नांदेड हे एक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात इतक्या संतपरंपरा आहेत की त्यामुळे या क्षेत्रस्थानाला धर्मक्षेत्र म्हणणे वावगे ठरणार नाही. शिखांचे दहावे गुरू श्री गोविंदसिंग यांच्या समाधिस्थानामुळे शिखांचे

भारतीय कीर्तीचे धर्मक्षेत्र म्हणून नांदेड तर महत्त्वाचे आहेच, पण याखेरीज मराठवाड्यातील एक औद्योगिक केंद्र आणि तदनुषंगाने कामगारांच्या संघटनेचे जागृत केंद्र म्हणूनही या गावाचे महत्त्व आहे. पोलिस -ॲक्शनपूर्व मराठवाड्यात नांदेडचे वाङमयीन चळवळीचे केंद्र म्हणूनही महत्त्वाचे स्थान आहे. महाजन आणि कान्त यांच्या कार्याची बैठक मूळ येथलीच. पण मला नांदेडविषयी जे ममत्व वाटते त्याचे कारण निराळे आहे. वजिराबाद हायस्कूल समोरील एका बसक्या घरातील 'वेष असावा बावळा' या म्हणीचे प्रात्यक्षिक अशी तात्यासाहेबांची मूर्ती हेच ते आकर्षण होय. मराठवाड्यातील संस्कृती, जुने मराठी साहित्य, जुने संस्कृत व फारसी ग्रंथ आणि