पान:वाटचाल (Vatchal).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मार्क्सवादी गुरू- भालचंद्रमहाराज कहाळेकर : ८३

नाही, अशी तयारी नसताना उठाव करणे हा आततायीपणा ठरेल, (ते साहसवाद, ॲडव्हेंचरीझम असे शब्द टाळीत) असे तुम्हाला वाटत असेल तर आपण पूर्वतयारीच्या दृष्टीने संघटना, संघर्ष, ह्यांचा विचार करू. समाजवादी समाजरचनेत जी आर्थिक रचना असेल तिथे तर आपला विरोध नाहीच. मग अशा वेळी तुमचा आमचा विरोध राहतो कुठं. मी समाजवाद ही नैतिक व आध्यात्मिक चळवळ आहे असे मानतो. तुम्ही ती अनैतिक चळवळ आहे असे माना. कहाळेकरांचा मुद्दा त्या वेळी आम्हाला पटला नाही. पण नंतर म्हणजे इ. स. १९५५-५६ नंतर क्रमाने ह्या मुद्दयाचे महत्त्व पटू लागले. आज तर ह्या मुद्द्यावर मी त्यांच्याइतकाच आग्रही झालो आहे. घडते काय की नीती आणि अध्यात्म हे प्रतिगामी विचारांचे लाडके शब्द आहेत म्हणून समाजवाद्यांचे नावडते शब्द झाले आहेत. एका चुकीच्या पद्धतीने प्रतिगामी लोक वापरतात म्हणून त्याचा खरा अर्थ शोधणे टाळता कसे येईल? आपण कधीतरी हा प्रश्न विचारायला हवा की, एखादी वाद नैतिक अगर अनैतिक कशामुळे ठरते ? एखादी भूमिका आध्यात्मिक का ठरते ? न्याय ही कल्पना जर नैतिक नसेल तर ह्या जगात नैतिक काही राहू शकेल का? निर्भय स्वातंत्र्य हे जर अध्यात्माच्या उद्दिष्टांचा भाग नसेल तर कोणती प्रार्थना आध्यात्मिक राहू शकेल का ? न्याय्य समाजरचना निर्माण करणे आणि भीतीमुक्त माणूस प्रत्यक्षात आणणे ह्यासाठी चालू असणारे आंदोलन हे जगातले सवांत महत्त्वाचे नैतिक आंदोलन मानणे माग आहे. मागच्या ऋषिमुनींनी समाजरचना व अर्थरचना ह्यांना धक्का न लावता व्यक्तिश: आपल्या जीवनाची नैतिक व आध्यात्मिक रचना करण्याचा प्रयत्न केला. यात आपण सर्व अर्थरचनाच, समाजरचनाच बदलून माणसाच्या सर्वच जीवनाची नैतिक पुनर्रचना करू पाहतो आहोत. समाजवाद ही नव्या संस्कृतीची नांदी ठरणार. ती नैतिक चळवळ असणे भाग आहे. हा मुद्दा कधीतरी सविस्तर लेख म्हणून मांडण्याचा माझा विचार आहे. तो थोडक्यात मांडला म्हणजे समजापेक्षा गैरसमज जास्त होतात. कै. महाराजांच्याविषयी मी अजून पुष्कळ सांगू शकेन. तपशिलाने निरनिराळ्या ग्रंथांच्याविषयी सांगता येईल. पण त्या प्रयत्नात मी पडणार नाही. माझा हेतू फार मर्यादित आहे. नानाविध विषयांचा गाढ व्यासंग असणारा, प्रखर बुद्धिवादी, कोणत्याही प्रकारची पोथीनिष्ठा नसणारा एक चारित्र्यवान व पुरोगामी विचारवंत आपण गमावला आहे. इतके सांगून मी थांबणार आहे. कहाळेकरांनी स्वत: काही लिहिलेले नसले तरी त्यांनी एक पिढीच्या पिढी घडविली. एक वातावरण निर्माण केले; ते काही मावळणारे नाही. महाराजांच्या निधनामुळे माझी वैयक्तिक हानी तर फार मोठी झाली आहे. कारण ह्या माणसाच्या सावलीखाली आम्ही २५ वर्षे होतो. पण ह्या व्यक्तिगत हानीपेक्षा मोठी हानी मराठवाड्याची, तेथील पुरोगामी सांस्कृतिक व वैचारिक चळवळीची झाली आहे.