पान:वाटचाल (Vatchal).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८२ : वाटचाल

राष्ट्रवाद व साम्राज्यवाद्यांची सोय ह्यातून निर्माण झालेल्या भूमिकांशी समरस होऊ लागल्या तर कुठेतरी घोटाळा होतो आहे हे समजून घेतले पाहिजे.
 प्राचीन भारतीय वाङमय, कला, इतिहास, धर्मपरंपरा ह्यांच्याकडे मार्क्सवादी चिकित्सापूर्वक पाहण्याचा थोडा फार प्रयत्न करतात, असे त्यांना वाटे. ह्यामुळेच राहुल सांकृत्यायन, दामोदर कोसांबी, देवीप्रसाद चट्टोपाध्याय ह्यांच्याविषयी त्यांना ममत्व होते. राजकारणाच्या झगड्यात उभे राहणाऱ्यांनी अभ्यास न करता इतर क्षेत्रांबाबत मते देण्याचा प्रयत्न केला तर त्यातून ठोकळेबाज भूमिका निर्माण होतात. म्हणून अधिक योग्य मार्ग त्या त्या ज्ञानक्षेत्राचे तज्ज्ञ आणि अभ्यासू असे मार्क्सवादी पंडित निर्माण करणे व त्यांना जाणकारीने बोलू देणे हा आहे. धर्माच्या चिकित्सक अभ्यासात त्यांना रस होता. कारण अंधश्रद्धांच्या जपणुकीचा 'धर्म' हा बालेकिल्ला असतो. भारतातील किती धर्मसंप्रदायांची आपण तपशिलाने ऐतिहासिक चर्चा केली आहे ह्याचा मार्क्सवाद्यांनी विचार केला पाहिजे असे ते म्हणत. राजकारणाच्या सोयीसाठी जेव्हा आपण धर्मचिकित्सा स्थगित ठेवतो त्या वेळी धार्मिक राजकारणाची तर आपण सोय पाहत नाही ना ह्याचा विचार करणे भाग असते.
 समाजवादी समाजरचना ही नैतिक आणि आध्यात्मिक समाज रचना आहे असे त्यांना वाटत असे. त्यामुळे अध्यात्म आणि नीती ह्याचा मावर्सवादाशी व समाजवादाशी जेवढा घनिष्ट संबंध आहे, तेवढा इतर कुणाचा असू शकणार नाही, असेही त्यांना वाटे. इ. स. १९५०-५२ च्या सुमारास राजकारणात माझा संबंध लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स ह्या गटाशी होता आणि ह्या गटाचे सर्व नेते कहाळेकरांना ओळखणारे, त्यांना मानणारे होते. त्यांतले काहीतर त्यांचे निकट मित्र होते; आंतरराष्ट्रीय राजकारणात साम्राज्यशाहीविरोध व शांततेचा पुरस्कार, अंतर्गत राजकारणात समाजवादी अर्थरचनेचा पुरस्कार करणारा व मार्क्सवादी असणारा हा एक स्थानिक गट होता. आम्ही नव्या भूमिकेने भारावलेलोही होतो. अतिरेक व आग्रही भूमिकाही प्रतिपादन करीत होतो. जास्त जहाल बोलणारा जास्त शुद्ध क्रांतिकारक वाटावा असे त्या वेळचे आमचे मत होते. समाजरचनेचा मूलभूत आधार आर्थिक असतो ह्यावर आमचा आग्रह होता. त्यामुळे नीती, अध्यात्म, हे सगळे शब्द आम्हाला नावडते होतेच, पण ह्या शब्दांना थोडा परंपरावादाचा प्रतिगामी गंध आहे असेही आम्हाला वाटे. त्या काळी ह्या प्रश्नावर महाराजांशी आमचे प्रचंड व तीव्र वाद होत. कहाळेकरांचा मुद्दा असा असे : वेगाने देशभर उठाव करून सत्ता हाती घेणे व क्रांती तातडीने घडवून आणणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते काय? तसे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उठावाला सिद्ध व्हा. आम्ही त्यात सहभागी होऊ. अजून उठाव करण्याजोगी पूर्वतयारी झालेली