पान:वाटचाल (Vatchal).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मार्क्सवादी गुरू-भालचंद्रमहाराज कहाळेकर : ८१

आज आपण मांडली तरी ते खंडनच करीत. ते म्हणत, खंडन काय कशाचेही करता येते. मुद्दाम एखाद्या मताचा विपर्यास केला की खंडन सोपे होते. समोरच्या माणसाला प्रस्तुत मुद्दे कोणते; अप्रस्तुत बाबी कोणत्या, विपर्यास कोणता हे कळावे; प्रत्येक प्रश्नातील गुंतागुंत कळावी असा त्यांचा प्रयत्न असे. ह्या चर्चांच्यामधून विद्यार्थी विचार कसा करावा हे शिकत असत. ही चिंतनक्षमता वाढविणे, विचारांना दिशा देणे ह्यात त्यांना फार रस होता.
 भारतीय कम्युनिस्टांशी त्यांचे मतभेद होतेच. प्रत्यक्ष राजकारणात ते नसल्यामुळे त्याला जाहीर वादावादीचे रूप आले नाही इतकेच. ह्यातील तुरळक मतभेद नोंदविण्यात अर्थ नाही. पण महत्त्वाचे मतभेद नोंदविणे योग्य होणार नाही. ते असे मानत की, भारतीय राष्ट्रवादाला आरंभापासून साम्राज्यवादविरोधाचा व आर्थिक वस्तुस्थितीचा एक पदर होता. मागासलेल्या देशातील स्वातंत्र्यचळवळीत सांस्कृतिक राष्ट्रवाद बलवान व प्रभावी असा असणारच. अशा ह्या वातावरणात भारताच्या स्वातंत्र्यलढयात सर्व शक्तीने बिनशर्त सामील होणे व ह्या लढयाचे साम्राज्यवादविरोधी रूप एकीकडे व आर्थिक रूप दुसरीकडे बलवान करीत नेणे कम्युनिस्टांना अगत्याचे वाटायला हवे होते. त्यामुळे भारतीय राष्ट्रवादाचे नेतेच कम्युनिस्ट झाले असते. परिणामी भारतीय स्वातंत्र्यलढा अधिक प्रखरपणे समाजवादी रूप धारण करू शकला नाही. ते म्हणत, जनतेच्या चळवळी जेथे असतात तेथे नेत्यांच्या भूमिका पाहून चळवळीपासून दूर राहणे चुकीचे असते. चळवळीत सर्व सामर्थ्याने घुसून तिला इष्ट वळण लावणे व नवे नेतृत्व आणणे महत्त्वाचे असते.
 त्यांचा दुसरा मुद्दा अखंड भारताच्या संदर्भात होता. भारत हे एक राष्ट्र होते व आहे असे त्यांचे मत नव्हते. पण येथे प्रयत्नपूर्वक एक राष्ट्र उभे करता येईल असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांच्या अखंड भारताच्या भूमिकेला सांस्कृतिक राष्ट्रवादाची पार्श्वभूमी नव्हती. महाराज म्हणत, मुसलमान हे एक राष्ट्र आहे. अल्पसंख्याक नव्हते म्हणून त्यांना स्वतंत्र राष्ट्र होता आले पाहिजे ही मुस्लिम लीगची भूमिका उघडच धार्मिक राष्ट्रवादाची भूमिका होती. अशी भूमिका घेऊन फुटून निघालेला तुकडा आपल्या अस्तित्वासाठी जागतिक साम्राज्यवाद्यांच्या हातचे खेळणे होणारच. छोटे छोटे निरनिराळे तुकडे पाडावे म्हणजे सगळेच दुर्बळ होतात. त्यांना साम्राज्यवाद्यांच्या हातातले बाहुले होण्याशिवाय पर्याय नसतो. राजे असणारी, सरंजामशाही मनोवृत्तीचे शासन असणारी संस्थाने जर स्वतंत्र राष्ट्रे झाली असती तर ह्या संस्थानांच्यामध्ये एक एक लष्करी तळ आलाच असता. आजही जर काश्मीरचे स्वतंत्र राष्ट्र झाले तर तो साम्राज्यशाहीचाच तळ होईल. जागतिक साम्राज्यशाहीला सोयीची असणारी बाब ही पुरोगामी मंडळींना विरोधाची व गैरसोयीची वाटावी ही अपेक्षा असते. जर पुरोगामी राजकीय विचारधारा सांस्कृतिक