पान:वाटचाल (Vatchal).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८० : वाटचाल

नाही. ज्या बाबी समोरच्या पुराव्याने आपण सत्य मानू, त्या केवळ मार्क्सने सांगितल्या म्हणून खोटया समजावयाच्या हा हटवाद जर मंडळींनी सोडला तरी ते पुरे आहे. अर्थातच हेही खरे आहे की, महाराज मार्क्सवादी होते हा आमच्या आकर्षणाचा प्रमुख मुद्दा नव्हता. त्यांचा नानाविध विषयांचा प्रचंड व्यासंग व तर्कप्रधान अशी अलौकिक बुद्धिमत्ता हेच त्यांचे प्रमुख आकर्षण होते.
 महाराज असे मानीत की, मागासलेल्या प्रदेशात परंपरावाद प्रभावी असतो. जे प्रश्न पन्नास वर्षांपूर्वी इतरांनी चर्चिले ते प्रश्न आज आपण चर्चितो. त्याचे उदाहरण म्हणून ते मराठी कवितेकडे बोट दाखवीत. ही रोमँटिक भूमिका घेणारी मराठी कविता युरोपात रोमँटीसिझम मागे पडल्यानंतर इथे वाढली. आधीच भारतीय मन मागासलेले आहे. त्यात पुन्हा आपण इतरांच्या मागे हे घडणे बरोबर नाही. म्हणून त्यांनी नवकाव्य, नवकथा, नवटीका ह्यांची अखंड चर्चा मराठवाड्यात चालू ठेवली. मर्ढेकरांच्या कवितेवर चर्चा आणि परिसंवाद त्यांच्यामुळे इ. स. १९५१-५२ पासूनच सुरू झाले. ते नवकाव्याचे समर्थक होते. पण हे समर्थन करताना मराठी कवितेला मध्यमवर्गीय मनाची मर्यादा कशी पडली आहे ते स्पष्ट करीत. हा अद्ययावतपणाचा आग्रह केवळ वाङमयात नव्हे, तर सर्वत्रच ते ठेवीत.
 मर्ढेकर मराठी सौंदर्यशास्त्राच्या प्रौढावस्थेतील प्रथम पदन्यासाचे प्रतिनिधी होते. मर्ढेकर पूर्णपणे कलावादी म्हणून कम्युनिस्ट व मार्क्सवादी ह्यांच्या वाङ्मयीन भूमिकेचे विरोधक. आणि कहाळेकर हे मर्ढेकरांचे समर्थक. आम्हाला त्या वेळी हा विसंवाद वाटे. महाराज म्हणत, तूर्त वर्ष दोन वर्ष मी फक्त मर्ढेकर समजावून देणार आहे. मर्ढेकरांच्यामुळे जागतिक वैचारिक भूमिका पराभूत होतील असे वाटण्याचे कारण नाही. आपण बेडेकरही चर्चेसाठी समोर ठेवीतच आहोत. वर्ष दोन वर्षाने हा अभ्यास पचनी पडला म्हणजे मर्ढेकरांच्या मर्यादा मी सांगीन. त्या सांगताना आपोआपच मार्क्सवाद्यांना कलांच्याविषयी खरोखरच काय म्हणावयाचे आहे त्याची चर्चा होईल. महाराज मार्क्सवादी असल्यामुळे साहित्य समीक्षेत ते जीवनवादी होते. मराठी साहित्य समीक्षेवर कलावाद्यांचा प्रभाव सार्वत्रिक आहे. ते प्रामुख्याने कलावादी भूमिका सुसंगतपणे मांडणे किती अशक्य आहे ते दाखवीत. मार्क्सवाद्यांनी राजकारणाव्यतिरिक्त समाजजीवनाच्या इतर सर्व शाखा आणि सांस्कृतिक जीवन ह्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुरोगामी विचार जीवनात बलवान करणे कठीण झाले आहे असे ते म्हणत. एक नवा माणूस, नवा समाज निर्माण करण्याची प्रक्रिया फक्त राजकीय पातळीवरून यशस्वीरीत्या हाताळता येईल असे जर कुणी समजत असेल तर ती एक भ्रामक बाब ठरणार आहे असे त्यांना वाटे.
 त्यांची चर्चा करण्याची ठरलेली पद्धत असे. समोरचा माणूस जे मत मांडील त्यातील कच्चे दुवे ते हुडकून काढीत व खंडन करीत. काल मांडलेली भूमिका जरी