पान:वाटचाल (Vatchal).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मार्क्सवादी गुरू- भालचद्रमहाराज कहाळेकर : ७९

तीन होती. एक तर समोरचा माणूस ज्या विषयावर बोलत असे त्याच विषयावर ते बोलत. ही चर्चा करणारे भाषाशास्त्र, व्याकरण, इतिहास, वाङ्मय ह्यावर चर्चा करीत असत. आलेल्या प्रत्येक माणसाला राजकारणाच्या चर्चेत ओढून नेण्याची त्यांची प्रथा नसे. राजकारणावर बोलताना मात्र बारकाईने पाहणान्याला त्यांची मूलतः मार्क्सवादी बैठक चटकन कळे. वरवर चर्चा करणाऱ्यांना तीही लक्षात येत नसे. ह्या संदर्भात ते नेहमी दोन मुद्दे सांगत. ते म्हणत, लोकांना विचार कसा करावा हे शिकवा. जर विचार कसा करावा हे त्यांना जमले तर सत्यापर्यंत आपला प्रवास तेच करतील. मला माझी मते लादण्याची घाई नाही. कधी ते लेनिनचे वाक्य सांगत. त्याचा आशय जीवनाची संपूर्ण गुंतागुंत ध्यानी घ्या असा होता. दुसरे म्हणजे मार्सची व मार्क्सवाद्यांची परिभाषा ते कटाक्षाने टाळीत असत. त्यांचे म्हणणे असे की समोरचा माणूस मार्क्स आणि लेनिन ह्या नावाला बुजणारा असा मध्यमवर्गीय आहे. त्याला या मार्क्सवादी प्रवाहापर्यंत आणावयाचे असेल तर परिभाषा टाळा. दरवेळी उठल्या बसल्या मी द्वंद्वात्मक भौतिक वादातून किंवा ऐतिहासिक भौतिक वादातून ह्या प्रश्नाकडे पाहतो हे सांगण्याची काय गरज आहे ? तुम्हाला तुमचा मुद्दा वेगळ्या भाषेतही सांगता येतो. मत महत्त्वाचे आहे. परिभाषा महत्त्वाची नाही. परिणामी ते मार्क्सवाद सांगत आहेत हे पुष्कळदा कळतच नसे. ते म्हणत, समजा तुम्ही एखाद्या उजाड रानात गेलात, तर एक म्हणजे उन्हापासून बचाव व्हावा ह्यासाठी आपण आडोसा उभारू. दुसरे म्हणजे हळूहळू उन्हातून वावरण्याची सवय वाढवू. भोवतालच्या वस्तू आपली गरज भागविण्यासाठी वापरू. आपल्या गरजांनाही वळण लावू. असा कार्यक्रम दुहेरीच असणार ना? आणि ह्या दोन्ही बाबी परस्परावलंबी आहेत. विचार असा दुहेरी करावा म्हणजे सर्वांगीण व संपूर्ण होतो. डायलेक्टीकल मेथड ही अधिक परिपूर्ण व निर्दोष आहे असे ते म्हणत आहेत, हे विद्यार्थी विसरून जात.
 तिसरी बाब अशी की, त्यांच्या बोलण्यात मार्क्सवाद नसणाऱ्यांची मते उल्लेखिली जात. कौटिल्य अर्थशास्त्रातील 'अर्थमलो धर्म कामो' हे सूत्र ते घेत व कौटिल्याचे म्हणणे कसे बरोवर आहे हे सांगत. सरंजामशाहीच्या मानाने भांडवलशाही अधिक बेजबाबदार, क्रूर व निर्दय असते याचा ते खुलासा करीत, तरीसुद्धा भांडवलशाही प्रगत अवस्था का मानावयाची हे ते सांगत. पण हे सांगताना आपण 'कॅपिटल' चा एक भाग सांगतो आहोत असे ते म्हणत नसत. या व अशा पद्धतीमुळे ते जडवादी आहेत, मार्क्सवादी आहेत हे अनेकांना जाणवत नसे. ते म्हणत; जे मार्क्सवादी नाहीत त्यांनी उपलब्ध करून दिलेला प्रचंड पुरावा जर आपण तपासून त्याची संगती लावली, तर पुन्हा मार्क्सवादच सिद्ध होतो. एखादी बाब मार्क्स सांगतो म्हणून ती खरी आहे अशी भक्तांची भूमिका घेण्याची मला गरज