पान:वाटचाल (Vatchal).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७८ : वाटचाल

ह्या वर्तुळातच ते काम करीत राहिले. विशेषत: मराठवाडा साहित्य परिषदेचे ते प्रमुख कर्णधार होते. साहित्याच्या क्षेत्रात मराठवाड्याचे मागासलेपण पुसून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. साहित्याच्या क्षेत्रात आज मराठवाडा एकदम पश्चिम महाराष्ट्राच्या शेजारी येऊन उभा राहिलेला दिसतो. याचे श्रेय प्रामुख्याने महाराजांचे आहे. खादीच्या कपड्यात गुंडाळलेली त्यांची ठेंगणी मूर्ती प्रथमदर्शनी उग्र भासत असे. ते प्रथमदर्शनी कठोर, तुसडे आणि राखीव मन असलेले असे वाटत व दिसत. जसजसा त्यांचा परिचय वाढे तसतसे हे जाणवे की, आपण प्रखर चारित्र्य व प्रखर तत्त्वनिष्ठेच्या पण मूलतः वत्सल आणि प्रेमळ माणसाच्या सहवासात आलो आहोत. त्यांच्या अध्यापनाचे क्षेत्र जरी मराठी असले, तरी अध्ययनाला कोणत्याही मर्यादा नव्हत्या. एका बाजूला अर्थशास्त्र व राजकारण, तर दुसन्या बाजूला धर्म-तत्त्वज्ञान व संस्कृती असा त्यांचा चौरस संचार असे. भाषाशास्त्र, इतिहास, व्याकरण, पौर्वात्य, पाश्चिमात्य समीक्षा हा तर खास प्रांत असल्यासारखा दिसे. नानाविध विषयांचा एवढा प्रचंड धर्म व अद्ययावत् व्यासंग त्यांनी केव्हा केला हे गूढ मला कधीही उकलले नाही. हे उघडच आहे की, माझ्या विचारांच्यावर त्यांचा ठसा अगदी गाढ होता. पुष्कळ वेळा तर त्यांनी मांडलेली मते जशीच्या तशी माझ्या लेखनात आलेली आहेत.
 तसे त्यांचे घराणे हे महाराज घराणे. त्यामुळे भालचंद्र हे अभिधान तर त्यांना चिकटलेले होतेच. पण रूढ अर्थाने महाराजपणाशी त्यांचा संबंध नव्हता. धर्म-परंपरेच्या कोणत्याही चालीरीतीशी त्यांचा संबंध नव्हता. त्यांना मनाचा परंपरावादही मान्य नव्हता. रूढ धर्माशी त्यांचा संबंधही येणे शक्य नव्हते कारण ते मूलतः मार्क्सवादी होते. प्रत्यक्ष राजकारणाच्या लढ्यात उभा असणारा मार्सवादी निराळा असतो. त्याची बोलण्याची शैलीही निराळी असते. पण सांस्कृतिक व ज्ञानाच्या क्षेत्रात असणारा मार्क्सवादी निराळा असणे भागच असते. कै. बेडेकरांच्या विषयी ह्यामुळेच त्यांना गाढ ममत्व होते. पण बेडेकरांच्यापेक्षा त्यांचे मार्क्सवादी आग्रह तीव्र असत. माक्र्सवादी असल्यामुळे ते जडवादी व इहलोकवादीही होते. कोणत्याही भाबडेपणाला, भोळेपणाला तिथे जागा नव्हती. मराठवाडा ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत अद्ययावत् असावा असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच आमच्या आधुनिकतावादी व्यासपीठाचे महाराज ह्या अर्थाने त्यांना 'महाराज' म्हटले जाई. त्यांचा परलोकावर कधी विश्वासच नव्हता. म्हणून ते जन्ममृत्यूच्या चक्रातून आमची सुटका करतील ही आशाही नव्हती. ते कोणत्याही सत्तापदावर नव्हते त्यामुळे इहलोकीच्या दुःखचक्रातून सुटका करण्यासाठी त्यांचा उपयोगही नव्हता. ते होते ज्ञानपीठ. सदैव धगधगते.
 महाराज मार्क्सवादी आहेत ही गोष्ट प्रायः ध्यानात येत नसे. ह्याची कारणे