पान:वाटचाल (Vatchal).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मार्क्सवादी गुरू- भालचंद्रमहाराज कहाळेकर : ७७

संस्कृत, इंग्रजी, हिंदी, उर्दू ह्या भाषांच्यावर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना कामापुरते तेलगु-कानडीही येई. इ. स. १९५० साली मराठीचे प्राध्यापक म्हणून ते हैद्राबादला आले व त्यानंतर गेली २५ वर्षे हैद्राबादलाच ते स्थायिक होते. अलीकडे चार-पाच वर्षे त्यांची प्रकृती नादुरुस्तच असे. रक्तदाब आणि हृदयदौर्बल्य ह्यांनी ते आजारी होते. मे महिन्यात ते वारले. हा त्यांचा थोडक्यात लौकिक परिचय म्हणता येईल.
 हैद्राबाद संस्थानातील जनतेच्या आंदोलनांचा इतिहास उर्वरित महाराष्ट्रापेक्षा थोडा निराळा आहे. पुष्कळदा पश्चिम महाराष्ट्रातील मंडळींना तो चटकन ध्यानात येत नाही. ह्या जनता आंदोलनाची प्रमुख तीन वैशिष्टये आपण नेहमी समजून घेतली पाहिजेत. पहिली बाब अशी की हैद्राबाद संस्थान हे भारतातले अतिशय प्रतिगामी व मागासलेले संस्थान. ह्या संस्थानात जागृतीला आरंभ इ. स. १९२५ च्या आसपास होतो. पोलिस ॲक्शन होऊन भारतात हे संस्थान इ. स. १९४८ च्या उत्तरार्धात विलीन होते. स्थूलमानाने ह्या २५ वर्षांत मराठवाड्यात ज्या सर्व चळवळी झाल्या त्या पश्चिम महाराष्ट्रात इ. स. १८५० ते इ. स. १९५० ह्या शंभर वर्षांत झाल्या. त्याचा परिणाम असा होतो की चिपळूणकरांच्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षणाला आरंभ करू इच्छिणाऱ्या भावनात्मक राष्ट्रवाद्याच्या शाळेत पुढच्या पाच वर्षांच्या आत आग्रही मार्क्सवादी शिक्षक मार्क्सवाद शिकवताना दिसतात. आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते वाचनालये चालविताना, साहित्य परिषदा उभारताना आणि सभा-संमेलनांतून सनातन्यांच्या शेजारी वावरताना दिसतात. ह्या आंदोलनाचे दुसरे वैशिष्ट्य असे की, संस्थानिक मुसलमान, सरकारी नोकरीत मुसलमानांची प्रचंड संख्या, राज्यभाषा उर्दू आणि सरकारी पाठिंबा असणारी मुस्लिम जातीयवाद्यांची इत्तेहादुल मुसलमीन ही अत्याचारी संघटना असे सगळे वातावरण हिंदुत्ववादी राजकारणाला पोषक होते. पण हैद्राबादेत हिंदू जातीयवाद बलवान झाला नाही. सेक्युलर राष्ट्रवादी आणि पुरोगामी असेच नेतृत्व बलवान राहिले. ह्या आंदोलनाचे तिसरे वैशिष्ट्य हे की जनतेचे राष्ट्रवादी नेते मोठ्या प्रमाणात मार्क्सवादी होते. इ. स. १९४५ नंतर ह्या मार्क्सवादाचा एक गट काँग्रेसबाहेर कम्युनिस्ट पार्टी म्हणून काम करू लागला व एक काँग्रेसमध्येच राहिला. व ह्या दोन गटांचे स्नेहसंबंध घनिष्ट राहिले. म्हणून हैद्राबाद संस्थानात व्यावहारिक शिस्त म्हणून पूर्णपणे खादीघारी असणारे, वैचारिक निष्ठा मार्क्सवादाशी असणारे, आपला राष्ट्रवाद पुरोगामी आंतरवादाशी सुसंगत ठेवणारे खूप कार्यकर्ते सापडतात. भाई गोविंददास श्रॉफ हे अशा मंडळींपैकीच. ह्या वर्तुळातच महाराज स्वातंत्र्यपूर्व काळात रमले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी वैचारिक क्षेत्र स्वतःसाठी निवडले.
 मराठी अध्यापन, हैद्राबादचे मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठवाडा साहित्य परिषद