पान:वाटचाल (Vatchal).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी आस्तिक का नाही : ७५

व्हायचे आणि नंतर कद्रूच्या लक्षात आले की, शेपूट पांढरेच आहे. तेव्हा तिने आपल्या मुलांना- सापांना सांगितले की, शेपटीला तुम्ही मिठी मारा. तेव्हा नंतर विनता झाली दासी व कद्रू झाली मालकीण. मग पुढे गरुडाने आपल्या आईची दास्यातून सुटका केली.' अशी ही सगळी कहाणी सांगितल्यावर मला तात्पर्य विचारले. तेव्हा मी म्हणालो, "मला आधी हे सांगा पाहू की, ही कहाणी कलियुगातली आहे की त्रेतायुगातली, द्वापार की सत्ययुगातली आहे ?" ते म्हणाले, " ही कहाणी सत्ययुगातली आहे." तेव्हा या कहाणीचे तात्पर्य असे की, "कलियुगात माणसे जसे द्वेष, मत्सर करणारी, लबाड, लुच्ची आहेत, तसेच सत्ययुगातील माणसेही द्वेष, मत्सर करणारी, लबाड-लुच्ची होती. जसा त्या वेळी लबाड, लुच्च्यांचा विजय होतो तसाच याही वेळेला लबाडलुच्च्यांचा विजय होतो." तेव्हा मामा म्हणाले, " आमचे गुरू म्हणाले की, तू नरकात जाशील. तेव्हा मी त्याला 'endorse' करतो की तू नक्की नरकात जाशील."
 तेव्हा माझ्या मनावर सगळ्या धर्मवाङ्मयाचे जे संस्कार झाले आहेत, ते असे आहेत. इथे जागोजागी असा उल्लेख आहे की, देवाने अमकी लबाडी केली व त्यांचा विजय झाला. देवांच्या सर्व विजयाच्या कहाण्या सर्व पुराणांमध्ये भरलेल्या आहेत व सर्व कहाण्यांच्यामध्ये लबाडीचे उल्लेख आहेत. सबंध राक्षसांच्या पराभवाच्या कहाण्या पुराणांच्यामध्ये भरलेल्या आहेत. या राक्षसांच्या पराभवांच्या कहाण्यांमध्ये त्यांचा भोळेपणा हे कारण आहे. माणसे भोळी असल्यामुळे पराभूत झाली, माणसे लबाड असल्यामुळे विजयी झाली, एवढेच जर तुम्ही सांगणार असाल-धर्मामधून, तर त्यातून प्रेरणा लबाड असणे ही मिळणार आहे, सज्जन असण्याची नाही... ज्याला तुम्ही धर्माचे पूज्य वाङ्मय समजता त्या धर्माच्या पूज्य वाङ्मयात माणसाला नैतिक करणाची शक्ती नाही हे तुम्ही ओळखा.
 धर्माच्या नावाने आपण इहलोकांचे हितसंबंध बोलतो, धर्माच्या नावाने आपण इहलोकातील लबाड्यांचे संरक्षण करतो, धर्माच्या नावाने आपण सर्व प्रगतीचे अडथळे सांगतो. एवढेच जर आपण धर्माच्या नावाने करणार असलो तर मग त्याच्या विरोधी राहणे आणि आपण आस्तिक नाही हे सांगणे आवश्यक होऊन जाते.