पान:वाटचाल (Vatchal).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७४ : वाटचाल

मंडळी. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली- देवाने एकदा काय केले- समुद्र घुसळून काढण्याचे ठरविले. मंदारला केले रवी. वासुकीला केले दावे. शेपटाकडून झाले देव, तोंडाकडून झाले राक्षस. मग त्यांनी समुद्र घुसळून काढला. त्यातून चौदा रत्ने बाहेर आली. देव अमृत प्याले. वगैरे सारी कहाणी सांगितली व नंतर ते मला म्हणाले, " मी आता तुला ही कहाणी सांगितली. या कहाणीचे तात्पर्य काय ते सांग पाहू ?" तेव्हा मी म्हणालो, " या कहाणीचे तात्पर्य असे की, जे लबाड असतात त्यांना अमृत मिळते." तेव्हा ते भयंकर ऑफ झाले. ते म्हणाले, " असे नाही, देवांना अमृत मिळाले तेव्हा आपण देवाच्या बाजूने राहावे." मी म्हणालो, " मला तुमच्या कहाणीत जे जाणवले ते इतकेच की, जे लबाड असतात त्यांना अमृत मिळते." तेव्हा ते म्हणाले, "तू नरकात जाशील." आमच्याकडे वयाच्या नवव्या वर्षापासून हा मुद्दा आहे- 'तू नरकात जाशील.' आमचे आदरणीय विद्वान यज्ञेश्वर कस्तुरेशास्त्री मला म्हणाले, “ कुरुंदकर, तुम्ही रोज नास्तिक्याच्या गोष्टी बोलता, आपण मेल्यानंतर नरकात जाऊ याची भीती तुम्हाला नाही वाटत?" तेव्हा मी म्हटले, " नाही. आम्ही तेथे मोठा प्लॉट घेतला आहे. घर बांधण्याचे काम सुरू आहे. ते बांधून झाल्यानंतर तेथे राहायला जाऊ. पण अधून-मधून तुम्हालाही तेथे यावे लागेल." " मला कशाला तेथे यावे लागेल ?" तेव्हा मी म्हणालो, "संस्कृत पाठशाळेच्या ग्रँटचे फॉर्म घेऊन हिंडेल कोण ? तेव्हा ग्रँटसाठी यावेच लागेल, आठ-पंधरा दिवसांनी !"
 कधीही आस्तिक मंडळींना असे वाटतच नाही की, समोरच्या माणसाला तुम्ही नरकात जाल असे म्हणणे ही शिवी आहे. मी जर त्यांना असे म्हणालो की, " आपण अत्यंत मठ्ठ आहात, तेव्हा आपण नरकातच जाणार." तर त्या माणसाला असे वाटेल की, एवढा विद्वान माणूस, धार्मिक माणूस ; त्याला तुम्ही अशा शिव्या देता आहात ? पण त्यांनी जर असे सांगितले की, तुमचा देवावर विश्वास नाही ना ? मग तुम्ही नरकात जाल, तर ती मात्र आम्हाला शिवी आहे असे वाटत नाही. या सर्व धार्मिक मंडळींना आपण समोरच्या माणसाचा अपमान करतो याचा कॉमनसेन्स सुद्धा नसतो, असा माझा अनुभव आहे.
 एकदा माझे मामा डॉ. नांदापूरकर- यांचे गुरू चिं. नी जोशी यांनी मला महाभारतातील आदिपर्वातील कश्यपाची कहाणी सांगितली. ते म्हणाले, “ भी तुला एक गोष्ट सांगतो, त्याचे तात्पर्य तू मला सांग." मी म्हणालो, " सांगतो." त्यांनी मग गोष्ट सांगितली. कश्यपमुनींच्या दोन बायका होत्या. एकीचे नाव होते विनता, दुसरीचे नाव कद्रू. या दोघींनी एकदा सिद्ध करावयाचे ठरवले की, सूर्याच्या रथाच्या घोड्याची शेपटी पांढरी की काळी ? दोघींनी प्रतिज्ञा केली की, जिचे म्हणणे खरे असेल तिने मालकीण व्हायचे व जिचे खोटे असेल तिने जन्मभर दासी