पान:वाटचाल (Vatchal).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी आस्तिक का नाही : ७३

व ज्यांना तो जाणवतच नाही त्यांनी 'नाही' असे प्रामाणिकपणे सांगावे. इतके आपण कबूल करायला तयार आहोत काय ? हे जर कबूल असेल तर शेकडा ९८ धार्मिक व सश्रद्ध माणसे अप्रामाणिक आहेत असे म्हणावे लागते. व हाच तर माझा मुद्दा आहे की, ईश्वरावरची श्रद्धासुद्धा तुम्हाला प्रामाणिक राहायला उपयोगी पडत नाही. शांत राहायला उपयोगी पडत नाही, समाजाच्या कल्याणासाठी उपयोगी पडत नाही. माणसाच्या ठिकाणी किमान दानत असायला पाहिजे की, आपल्याला ईश्वरासंबंधी वाटते हे खरे बोलावे. हे खरे सांगायला देखील ईश्वराची श्रद्धा उपयोगी पडली नाही. ईश्वर अशी नेहमी प्रेरणा देत आला की, 'खोटे बोल !' म्हणत रहा, 'काशीस जावे, नित्य वदावे !' असे तोंडाने म्हणत राहावे, 'देव आहे, देव आहे.' मला तो दिसणार नाही, पण आहे. कारण देव दिसण्याइतका मी कुठे पुण्यवान आहे ? जे महान पुण्यवान आहेत त्यांना तो दिसतो व जे कुणी महान पुण्यवान आहेत ते आपल्याला कधी दिसतच नाहीत. जर देव तर्काने सिद्ध होत असेल तर 'देव आहे,' हे कुणाला कधीही सिद्ध करता येणार नाही आणि जर देव ही तर्काने सिद्ध होणारी गोष्ट नसेल व ज्यांना देवाचा अनुभव नाही त्यांनी ' देव आहे' असे मानणे, हे अप्रामाणिकपणाचे लक्षण आहे. मी काही अणू पाहिलेला नाही, तरी मी अणू आहे असे मानतो. कारण तो पुराव्याने सिद्ध करता येतो. ज्याचा अनुभव मी घेतलेला नाही, तरी पण त्याची शक्यता मी मानतो. कारण त्या गोष्टी पुराव्याने सिद्ध करता येणान्या आहेत. जे पुराव्याने सिद्ध करता येत नाही आणि प्रत्यक्ष अनुभवाचा विषय नाही, ते आहे असे जर मी सांगत असेन, तर जे पुराव्याने सिद्ध करता येते व जे प्रत्यक्षाचा विषय आहे ते नाही असे मला मानले पाहिजे. हा मुद्दा Logic चा आहे.
 देवाच्या नादी लागून माणूस उगीचच भ्रामक युक्तिवाद करीत आहे आणि देवाच्या नादी लागून भ्रामक युक्तिवाद करीत असताना माणसाला आपण बुद्धिवादी झालो आहोत असा निष्कारण भ्रम व्हायला लागतो.
 मी लहानपणापासून धर्मवाङमय वाचले आहे. बहुतेक धार्मिक मंडळींनी जे धर्मवाङमय वाचलेले असते त्यापेक्षा अधिक मी ते वाचले आहे आणि माझी श्रद्धा आहे की, बहुतेक लोक धार्मिक आहेत याचे कारण त्यांनी धार्मिक वाङ्मय वाचले नाही. आणि प्रत्येक जण आपल्या धर्माचे वाङ्मय वाचायला टाळाटाळ करतो. आम्ही मूर्ख असल्यामुळे श्रद्धेने आम्ही आमच्या धर्माचे वाङ्मय वाचायला सुरवात केली, हा आमच्या नास्तिक्याचा आरंभ आहे. गेल्या वर्षी मी लहान मुलांच्या मासिकासाठी एक लेख लिहिला आहे. ती गोष्ट अगदी खरी घडलेली आहे. उस्मानिया विद्यापीठाचे पहिले मराठी विभागाचे प्रमुख श्री. काकासाहेव जोशी हे मी लहान असताना वसमतला आले होते. त्यांना गोष्टी सांगण्याचा खूप नाद. ही सर्व धार्मिक