पान:वाटचाल (Vatchal).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७२ : वाटचाल

Positive आहे. तो हिंसेला उपयोगी पडला, पापाला उपयोगी पडला, मारामारीला उपयोगी पडला; पापाच्या समर्थनासाठी, अन्यायाच्या समर्थनासाठी उपयोगी पडला. नाही तर तुम्ही अस्पृश्यतेचे समर्थन कसे करता? दोन हजार वर्षे तुम्ही अस्पृश्यतेचे समर्थन करीत आलात. माणसासारख्या माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याची संधीच तुम्ही देत नाही आणि हे काम अत्यंत पवित्र आहे असे सांगता बेशरमपणे ! याला देव उपयोगी पडतो. तसेच जगातील सगळ्या अनीतीला देव उपयोगी पडतो.
 असा भाग असताना मग प्रश्न विचारात घ्यावा लागतो मी आस्तिक आहे हे म्हणणे- नास्तिक आहे हे म्हणणे. या म्हणण्याला समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने काय अर्थ आहे ? देवामुळे माणसे जर नैतिक राहिली असती तर मग देवाचे नाव घेऊ नका असे म्हणालो नसतो. उलट माणसांनी नैतिक राहावे अशी आमची इच्छा असल्यामुळे आम्ही मग- श्रद्धा नसतानाही- देव आहे अशा थापा देत राहिलो असतो.
 ईश्वर हा शेवटी तर्कवादाचा मुद्दा नाही. शेवटी माणूस दुःखात आल्यानंतर ईश्वराचे नाव घेतो. याला आमचा काही विरोध नाही किंवा मी दुःखात आल्यानंतर देवाचे नाव घेईन असा माझा अंदाज आहे. ज्या वेळी आपण निराश होऊ त्या वेळी देवाचे नाव घेऊ, पण त्यामुळे देव आहे असे सिद्ध होते का? हा कुठला भ्रम आहे ? अतिशय चतुर माणसे कोणत्या भ्रमाचे प्रतिपादन करू लागली आहेत हे समजत नाही. ज्या वेळी सगळे संपून जाईल, काहीच शिल्लक राहणार नाही, त्या वेळी देवाचे नाव घेणे हा सज्जड पुरावा आहे का? पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर चार-सहा महिन्यांनी माणसाला काही बोलता येत नाही. त्याला 'हायड्रोफोबिया' होतो त्या वेळी तो जे बोलू लागतो ते भुंकल्यासारखे वाटू लागते. पण खरे म्हणजे त्याला मरण्याची इच्छा नसते, व तो जे भुंकल्यासारखे बोलतो, तो ' मला वाचवा, मला वाचवा' असे म्हणायला लागतो, त्यामुळे काय देव आहे असे सिद्ध होते ? जिथे काहीच माणसाचा उपाय चालत नाही तेथे देवाचे नाव घेता, तेव्हा देव आहे हे सिद्ध होते का ? आम्ही तीर्थयात्रेला जातो तेव्हा 'राम, राम' असे शब्द म्हणतो. त्यामुळे राम सिद्ध झाला आहे का? खांद्यावर प्रेताचे ओझे घेऊन आम्ही निघतो व तोंडाने ' रामनाम सत्य है ' असे म्हणतो त्यामुळे रामनामही सिद्ध होत नाही व रामही सिद्ध होत नाही.
 देव हा तर्काचा विषय नाही तर तो अनुभवाचा विषय आहे.तेव्हा ज्यांना त्याचा अनुभव असेल त्यांनी 'आहे' म्हणून सांगावे, ज्यांना तो नसेल त्यांनी 'नाही' म्हणून सांगावे. एकही अपवाद जाता कुणालाही परमेश्वराचा अनुभव आला आहे असे मला वाटत नाही. हे तुम्हांला मान्य आहे की, देव हा तर्काचा विषयच नसल्यामुळे ज्यांना तो दिसतो आहे, जाणवत आहे त्यांनी 'दिसतो आहे ' असे मानावे