पान:वाटचाल (Vatchal).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी आस्तिक का नाही : ७१

प्रगतीच्या सर्व शक्यता या आस्तिकबुद्धीमुळे नाहीशा व्हायला लागतात. त्या दिवशी हे सांगण्याची वेळ येते की, हा सर्व मूर्खपणाचा भाग आहे उरलेल्यांच्यासाठी व लबाडीचा भाग आहे, काही जणांसाठी.
 शेवटी आस्तिक किंवा नास्तिक हे भांडण केवळ तत्त्वज्ञानापुरते नाही, हे तर भांडण सामाजिक प्रश्नांसाठी आहे. या नांदेड गावामध्ये आमचे एक मुसलमान मित्र मला म्हणाले, " इस्लामशी तुमचे काय मतभेद आहेत ?" मी म्हणालो, " काही नाही. साधा मुद्दा आहे, तू मुसलमान आहेस. तुझा तुझ्या धर्मग्रंथावर विश्वास आहे. मी मुसलमान नाही, माझा धर्मग्रंथावर श्विवास नाही. माझी कोणत्याच धर्मावर श्रद्धा नसल्यामुळे धर्मग्रंथावर श्रद्धा नाही, हे बरोबर आहे ना?" तो म्हणाला, " बरोबर आहे." व उठून गेला.
 सर्व धार्मिक माणसांचा बुद्दुपणा हा माझ्या जीवनामधले फार मोठे दुःख आहे. धार्मिक माणसाची बुद्धीच मंद होते अशी माझी समजूत आहे. जन्मभराच्या अभ्यासामुळे माणसाच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचे कामच धर्माने सातत्याने केले आहे. प्रगतीला अडथळा आणण्याचे काम धर्माने केले आहे.
 मुद्दा असा आहे की कोणत्याही- देवावरच्या-श्रद्धेमुळे का होईना जर माणसे नैतिक राहिली असती तर राहू द्यात. ईश्वरावरील श्रद्धा माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडली असती तर कदाचित ईश्वराच्या श्रद्धेविरुद्ध कसे बोलावे याचा मी दहावेळा विचार केला असता. धर्मावरची सर्व श्रद्धा सर्व अनैतिक बाबींचे समर्थन करण्यासाठी, जगाच्या इतिहासात वापरली गेली आहे. जगाचा व भारताचा इतिहास जर पाहिला तर असे आढळते की मानवी जीवनातल्या सगळ्या अनैतिक बाबींच्या समर्थनासाठी धर्मावरची श्रद्धा शतकानुशतके वापरली गेली आहे. आणि लोकांनी ती कबूल केलेली आहे. पण धर्म जर माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडला असता तर एकाही देवळाच्याजवळ एवढी संपत्ती जमा झाली नसती. देवाचे नाव घेऊन मटका चालवायचा. साईबाबाचे नाव घेऊन आकडा लावायचा. म्हणजे साईबाबाच्या नावाचा उपयोग जुगारीसाठी करायचा.
 माणसाच्या आस्तिक्यबुद्धीने स्वतःच्या सर्व भ्रष्टाचाराचे समर्थन परमेश्वराच्या नावावर हुडकून काढले. आणि म्हणून ईश्वराची कल्पना शांततेला उपयोगी पडली नाही, तर माणसे ईश्वराचे नाव घेऊन एकमेकांची डोकी फोडतच राहिली. हाच जगाचा इतिहास आहे. सर्व हिंदू-मुसलमानांची भांडणे तशीच आहेत, सगळी स्त्रिश्चनांची- कॅथलिक व प्रोटेस्टंटांची- भांडणे तीच आहेत. माणसाला शांततेनं जीवन जगायला कधीही देव उपयोगी पडला नाही. माणसाला नीतिमान व्हायला कधी देव उपयोगी पडला नाही. आणि माणसाला सगळ्या समाजाच्या बरोबर त्या समाजाच्या ऱ्हासाला थांबविण्याची प्रेरणा कधी देवाने दिली नाही. देवाचे काम