पान:वाटचाल (Vatchal).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७० : वाटचाल

विचारपूर्वक बनवलेले आहे. समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने हे हिताचे असेल, तर हे मत मी आग्रहाने मांडेन. आस्तिकांच्या विरोधात उभा राहीन. तिथे मी कुणाचीही भीडमुर्वत बाळगणार नाही. पण तसे काही चालत असेल तर मी उगीच कुणाशी भांडत बसणार नाही. कारण जीवनाचे माधुर्य पुष्कळसे अज्ञानाने भरलेले आहे.
 जर एखादे वेळी बायको मला म्हणाली की तुमचे आणि आमचे ऋणानुबंध गतजन्मीचे आहेत. तर मी आगाऊपणा करून असे म्हणणार नाही की हे संबंध गतजन्मीचे नाहीत. ते ह्याच जन्मीचे आहेत. कारण हे बायकोला सांगितल्यामुळे पुन्हा जेवायला मिळणार नाही. तेव्हा हे भांडण मी करणार नाही.
 एकदा माझ्या आईने मला विचारले, " अरे नरहरी, तू नास्तिक, तू देव मानीत नाहीस म्हणे. अरे, मग मी मेल्यावर माझे श्राद्ध करशील की नाही ?" तेव्हा मी विचारले की, मला आधी हे सांगा की, तुमच्यापैकी कोण आधी मरणार? तेव्हा आई म्हणाली, " माझी इच्छाच असेल तर अहेव मरण ही कुठल्याही बाईची इच्छा असणार !" "ठीक आहे, तू आधी मेलीस तर बाबा मागे पाहायला आहेत तोपर्यंत मी श्राद्ध करीन. जर बावा मेले तर तू पाहायला आहेस तोपर्यंत श्राद्ध करीन. तेव्हा दोघेही मेल्यावर मी काय करीन ते मी सांगायला तयार आहे. पण ते पाहण्यासाठी तुम्ही असणार नाही. समजा मी सांगितले की, मी दोघांचेही श्राद्ध करीन अन् ते केले नाही तर तुम्हाला बरे वाटेल का ?" तेव्हा आई म्हणाली, “अजिबात बरे नाही वाटणार !" " अन् समजा मी नाही म्हटले अन् पुढे करीत राहिलो तर तुम्हाला वाईट वाटेल का ?" आई म्हणाली, ' तसेही नाही' मग " तुम्ही ही श्रद्धा ठेवून म्हणायला हरकत नाही की " श्राद्ध होत राहणार." तेव्हा मी काही त्यांना असे म्हटले नाही, 'मी काही तुमचे श्राद्ध करणार नाही.'
 आजीने एकदा देव आहे हे सिद्ध करून दाखवणारा पुरावा मला दिला. नारळात पाणी हे देवाने घातले आहे तेव्हा देव आहे असे तिचे म्हणणे. मी तिच्या समाधानासाठी म्हटले, "आजपर्यंत हा मुद्दा मला कुणी पटवूनच दिला नव्हता. आजपासून ' देव आहे' असे मानायला सुरुवात करतो."
 समाजातील हजारो, लाखो माणसांच्या भावना या ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या आहेत. तेव्हा एवढाच जर मुद्दा असेल तर काय म्हणून त्यांच्या भावना दुखवायच्या? जर एवढाच मुद्दा असेल तर मीही माझ्या नास्तिक्याचा आग्रह धरायला तयार नाही. उगीच कुणाच्या आस्तिक्याच्या विरोधी भाषण देण्याची माझी इच्छा नाही. पण अडचणीची गोष्ट अशी आहे की मुद्दा फक्त एवढाच नाही. तर सबंध समाजातील आस्तिक्यबुद्धी ही समाजाला हानिकारक असणाऱ्या सर्व चालीरीती, परंपरा, रूढी यांना घट्ट धरून बसते आणि समाजाचा पूर्ण विनाश झाला तरी तो विनाश नसून ते प्राक्तन आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते. आणि मग समाजाच्या