पान:वाटचाल (Vatchal).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझी आई : ७

 लग्नाच्या आदल्या दिवशीच वऱ्हाड आले आणि मग सर्वांनाच हे कळले की, बातमी काही खरी नाही. मुलगा अगदीच तरुण आहे. कोड वगैरे काही नाही. आता मुलगा काळा आहे हे खरे, पण काळेपणा हा काही मुलाच्या बाबतीत दोष थोडाच आहे ? " मुलगा मोठा तेजदार आहे. थोडा सावळा रंग गडद आहे, पण त्यात वाईट काय ? ती सगळी देवाची करणी. माणसाचा दोष असला तर माणसाला बोल लावावा." असे आजीचे म्हणणे. माझ्या आईला आपला नवरा काळा आहे असे वाटतच नाही. ती सावळा म्हणते. आणि मला तर माझी आई चक्क निमगोरा मानते. माया ही नेहमी अशी थोडी अंधच असते.
 आई सांगते, तिने नवरा अंतरपाट दूर करून गळयात माळ घालण्यापूर्वी आदल्या दिवशीच माडीवरून चोरून पाहिला होता. " अरे, बापा नरहरी, आमच्या वेळी प्रेम कुठे होते आणि आम्हाला कळत तरी काय होते ? भातुकली खेळण्याचे वय. तेव्हा मी प्रेम कसे करणार? ते तुमच्या वेळी आले. आता तुम्ही प्रेम करा. आम्हांला आनंद आहे. आम्ही आपला हौसेने संसार केला आणि देवाच्या दयेने काही कमी पडले नाही." आपल्या नवऱ्यावर आपले प्रेम आहे किंवा नवऱ्याचे आपल्यावर प्रेम आहे ही कल्पना तिला आवडत नाही. प्रेम हा शब्दच तिला आवडत नाही. " ब्रह्मदेवाने स्वर्गात सातजन्माच्या गाठी बांधल्या, त्याप्रमाणे नवरा वाट्याला आला. माझे नशीब चांगले, नवरा चांगला निघाला. म्हातारपणापर्यंत सुखाचा संसार झाला. आता प्रेम आहे काय आणि नाही काय, सगळ्याच बाबी फालतूपणाच्या." अशी आईची अस्सल सनातनी भूमिका आहे. प्रेम शब्दाच्या मानाने माया शब्द तिला आवडतो." पण तुझी तुझ्या नवऱ्यावर माया आहे का?" हा प्रश्न तिला आवडत नाही. हा प्रश्न कुणी विचारणे म्हणजे आपला अपमान करणे, असे तिला वाटते. काय हा आचरट प्रश्न ? माया आहे म्हणजे काय ? नवरा म्हटल्यावर माया असतेच. जन्मोजन्मीचा नवरा. तो काही एका जन्मापुरता नाही. मागोमाग हाच नवरा म्हटल्यावर माया कशी असणार नाही ?"
 एकूण आईच्या मते हा सात जन्मांचा हिशेब आहे. यांपैकी किती जन्म मागे झाले याबाबत तिचा थोडासा गोंधळ, घोटाळा आहे. माझे वडील वेदान्ताचे अभ्यासक. त्यांची चारित्र्याबद्दल ख्याती. गाववाले त्यांना पुण्यवान व अर्धा साधूच मानतात. तेव्हा या जन्मी वडिलांना मोक्ष-जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटका. आणि वडिलांना मोक्ष म्हणजे आपल्यालाही निश्चित मोक्ष. तेव्हा हा जन्म सातवा, असे तिला वाटत असते. पण खात्री नाही. कदाचित हा जन्म सहावा असेल व अजून एक जन्म घ्यावा लागेल. खात्रीलायक बाबी फक्त दोन आहेत. एक म्हणजे मागचे जन्म असोत वा पुढचे, जन्मोजन्मी नवरा हाच आहे. दुसरी म्हणजे, बाबांना मोक्ष मिळाला की, तिला आपोआप मिळणार आहे. आणि पुढच्या जन्माबद्दल तिची तक्रार नाही. फक्त