पान:वाटचाल (Vatchal).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६ : वाटचाल

परभणी जिल्ह्यातील कुरुंदा या गावचे कुलकर्णी. फक्त उपनावापुरते कुलकर्णी होत. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांपैकीच होते. वीजवरही होते. माझी आई ही त्यांची दुसरी पत्नी.
 वडील वकिलीची परीक्षा पास झालेले होते. नांदेडला साहाय्यक वकील म्हणून काम करीत होते. त्यांची प्रथम पत्नी वारली तेव्हा ते २१ वर्षांचे होते. माझ्या मामांच्या सांगण्याप्रमाणे मुलगा अगदी तरुण. घर खातेपिते. मागे पाश नाही. त्यांच्या भाषेतच सांगायचे तर 'पहिल्या लग्नाजोगा कोवळा पोरगा. फक्त आधीच्या लग्नाचा डाग होता.' हा मुलगा पूर्णा स्टेशनवर रात्रीच्या अंधारात मामांनी ओझरता पाहिला आणि बहीण याला देण्याचा निश्चय केला.
 मुलाने अगर मुलाच्या आईवडिलांनी मुलगी पाहिलीच नव्हती. " त्यात पाहण्याजोगे काय आहे ? मुलीसारखी मुलगी. व्यंग कोणतेही नाही. दहाजणींसारखी आहे." असे मध्यस्थाचे म्हणणे. ते मुलाच्या वडिलांना मान्य होते. मुलीने, तिच्या आई-वडिलांनी मुलगा पाहिला नव्हता. मामांनी ओझरता पाहिला होता. मध्यस्थ उभय बाजूचे नातेवाईकच होते. ते म्हणाले, “ स्थळ गमावू नका. मुलगा चांगला आहे." आणि लग्न ठरले.
 आई या लग्नाची हकीकत सांगते ती अशी : लग्न म्हणजे काय हे तिला फारसे कळत नाही. ताशे-वाजंत्री, नवे कपडे, गोड खाणे आणि सर्व घरभर उत्साह, गडवड इतकेच तिला कळले. ती ह्या सर्व धावपळ-उत्साहात सहभागी झाली. लग्नापूर्वी दोन-तीन दिवस घरचे सर्व वातावरण एकाएकी उदास व विषण्ण झाले. बातमी अशी आली की, नवरा मुलगा चांगला ४० वर्षांचा असून त्याला कोड फुटलेले आहे. पोरीचे नशीब फुटले म्हणून आजी दोन दिवस रडत होती. लग्नाची तयारी आणि डोळे पुसणे असा तिचा कार्यक्रम चालू होता. मोठे मामा सांगत, " सगळेजण मला विचारू लागले. मी तरी काय सांगणार ? अंगात कपडे होते. डोक्यावर टोपी उपरणे होते. रात्र होती. उजेड मंद होता. मला नक्की वय काय कळणार ! मी दुरून मुलगा पाहिला होता. मी म्हटले, थांबा. दोन दिवसांनी वऱ्हाड येईल, मग कळेलच." पण कुणी खात्री करण्यासाठी कुरुंद्यास गेले नाही. फुकट २-३ रुपयांचा खर्च कोण करणार? एकदा ठरलेले लग्न मोडता थोडेच येते ? ते घराण्याच्या प्रतिष्ठेला कसे शोभणार ? आणि देवाने ठरविलेले नशीव कसे बदलणार? बरे झाले तर आनंद मानावा. देवाची दया समजावी. वाईट झाले तर रडावे. आपले नशीब फुटके आहे, असे समजावे. यापेक्षा माणसाच्या हाती काय आहे ! या मुद्दयावर आजोबा, आजी, मोठे मामा, यांचे एकमतच होते. मग निष्कारण खर्च कोण करणार ! आई आज सांगत नाही, पण तीसुद्धा दोन दिवस अतिशय सचिंत, घाबरलेली व दुःखी असणार, असे मला वाटते.