पान:वाटचाल (Vatchal).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८ : वाटचाल

एक प्रश्न तिच्या भावना दुखावू नयेत म्हणून मी तिला कधी विचारला नाही, विचारणारही नाही. तो म्हणजे, सात जन्म ती दुसरी पत्नीच असणार काय? आई ही बाबांची दुसरी पत्नी. आपल्या मृत सवतीविषयी तिच्या मनात खूपशी आपुलकी आणि थोडीशी धास्ती आहे. या सवतीची आशा संसारात असणारच. ते स्वाभाविक आहे. वर्षाला अविधवानवमीला तिला पाचारण केलेच पाहिजे. सर्व लग्नकार्य व शुभप्रसंगी तिची आठवण ठेवलीच पाहिजे. तिच्या नावे प्रथेनुसार खण, लुगडे चालूच असते. आईचे मत असे की, तिची सवत मानी व हट्टी आहे. तिला थोडे जरी विसरले तरी ती त्रास देते. म्हणून तिला विसरू नये. तशी ती फार समजूतदार व शहाणी आहे. न विसरता लग्नकार्यात लुगडे, एरवी खण, इतकीच तर तिची मागणी असते. आई म्हणते, " तुम्ही लग्नात हजारो रुपये खचिता, मला शंभराचे लुगडे घेता, मग तिला विसरून कसे चालेल ? तिला वीस-पंचविसाचे तरी लुगडे घेतले पाहिजे." आपली मृत सवत अधाशी, हपापलेली नसून समजूतदार आहे, असे आईचे मत. तीही आपल्या मुलाचे कल्याण इच्छिणारीच आहे, मत्सरी नाही. आता माणूस एखाद्या वेळी चुकतो, तशी सवतही चुकते. मग आई तिला वाकडेतिकडे बोलते. मग ही सवत पुन्हा चूक करीत नाही. आईसुद्धा तिच्या ह्या चुकीकडे क्षमेच्या नजरेने पाहते.
 माझी बहीण प्रसूत झाली तिथे सवतीने खण मागावा काय ? लेकीच्या बाळंतपणात कुठे आईने खण मागावा ? पण या सवतीने मागितला. आईने खण दिला. पण ही रीत नाही, हे वागणे चुकले, हे बजावून सांगितले. बहुतेक हे तिच्या सवतीला पटलेले दिसते. कारण ती पुन्हा चुकली नाही. आता ही सुमारे ५२ वर्षांपूर्वी, वयाच्या १६ व्या वर्षी मेलेली आमची सावत्र आई. पण तिचे अस्तित्व माझ्या आईच्या लेखी अजून चालू आहे. सवतीच्या नावे ब्राह्मण सुवासिनीला साडी, खण, रुपया, नारळ हे तर चालतेच, पण लग्नकार्यांत आई बांगड्या भरण्यापूर्वी सवतीला बांगड्या भरते. त्या सवतीच्या इच्छा आईला कशा कळतात व आईचे रागावणे तिला कसे कळते, हा मला अगम्य विषय आहे. पण पन्नास वर्षे हे अखंड चालू आहे. ह्या सवतीची आठवण तिला अखंड असते. छायारूपाने वावरणारी, माझ्या जन्मापूर्वी ४ वर्षे मृत झालेली ही आमची सावत्र आई, अर्धा जन्म सख्ख्या आईसह माझी सोबत करीत आली आहे.
 माझी आई नाकी-डोळी सरळ, अंगाने थोडी शेलाटी व मध्यम उंचीची आहे. चाळिशीच्या नंतर थोडेसे मांस तिच्या अंगावर आले, पण लठ्ठ अगर स्थूल ती कधीच नव्हती. आता होणारही नाही. तिचा रंग गोरेपणाकडे झुकलेला. तिची सर्व बहीणभावंडे गोरी. मोठे मामा तर गोरेपान व देखणे होते.
 नांदापूरकर मंडळीत ती सावळी. आम्ही कुरुंदकर मंडळी गडद सावळी.