पान:वाटचाल (Vatchal).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पूर्वपक्ष-उत्तरपक्ष : ६५

ही शरमेची गोष्ट आहे. यामुळे गावाची अब्रू जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी आपणांस शेवटची विनंती करीत आहे. इतक्या उपर जर आपण शांत राहिला नाहीत तर मग आजचे नाटक रद्द करावे लागेल." आणि मिनीटभर खरोखरच सगळीकडे शांतता होते व अध्यक्ष हसरा चेहरा करून वक्त्याला सांगतात, “ साहेब, आता बोला." आधी लोक व्याख्यान ऐकत नव्हते, त्या वेळी जर वक्त्याला लाज वाटली नसेल तर त्याला निदान नाटकाच्या धास्तीने लोक गप्प बसले ह्याची तरी लाज वाटतेच. ह्या दोन्ही वेशींतून जो बाहेर पडला त्याला विश्वविजयी होण्यासाठी 'अश्वमेधाचा घोडा' सोडण्याची गरज नाही. तो स्वयंभू विश्वविजयी' असतो. आपण विचाराल, " हा प्रसंग तुमच्यावर किती वेळा आला?" माझ्या प्रिय भूमीत असे विचारीत नाहीत. विचारलेच तर, " दर साल किती वेळा हा योग येतो !" असे विचारतात. माझ्यासारखा सनदी वक्ता फक्त हसतो. कारण असे प्रसंग काय मोजायचे असतात ! ते कबूलसुद्धा करायचे नसतात.
 आमच्याकडे परिचय करून देणाऱ्यांचा त्रास पूर्वी फारसा नसे. कारण सर्वांचेच परिचय सारख्या ठरीव पद्धतीने होत. त्यात काही गम्मत नसे. पण या चार-दोन वर्षांत नवे वारे निर्माण होत आहे. 'हसऱ्या व खेळकर' शैलीत वक्त्याचा परिचय करून देण्याची नवी टूम निर्माण होत आहे. त्यात कोणत्या कोटया कोणत्या वेळी व्यक्त होतील ह्याचा नेम नाही. एक विद्वान माझा परिचय करून देताना म्हणाले, " कुरुंद-हे दगडाच्या एका प्रकाराचे नाव आहे. ह्या दगडाची जाती तयार केली जातात. उपचार म्हणून जात्यालाच कुरुंद म्हणता येईल. आजचे वक्ते निरनिराळ विद्वान विद्यार्थी तयार करीत आहेत. म्हणून ते खऱ्या अर्थाने 'कुरुंद-कर' आहेत. शिवाय ते स्वतःही फार श्रेष्ठ प्रकारचे 'कुरुंद' आहेत." दूसरे एक विद्वान एकदा म्हणाले, " आपल्या सौंदर्याने स्त्रियांचे मनहरण करणारे ' नारीहर' पुष्कळ आहेत व पुढे होतील. पण आजचे वक्ते नारीहर नसून त्यापेक्षा फार श्रेष्ठ कोटीतील म्हणजे 'नरहर' आहेत." आमच्या नांदेडलाच एक माझे मित्र असे आहेत की, ते कोणत्याही वक्त्याचा परिचय करून देताना, " त्या दयाघन प्रभूने जेव्हा संकल्पमात्रे करून मिथ्या प्रपंचाची उभारणी केली, तेव्हापासून आजवर हे जगताचे रहाट-गाडगे चालूच आहे. ह्या चक्रनेमिक्रमात जे खरे शहाणे आहेत ते मौनपूर्वक अलिप्त होऊन मोक्षाला जातात. इतर प्रपंची-जन या मायाजालाला सत्य समजून लिप्त होतात." असा आरंभ करून मग वक्त्याकडे वळतात. हे माझे मित्र निवृत्त शिक्षक आहेत. शेकडो शिक्षणाधिकाऱ्यांचा परिचय त्यांनी ह्या प्रकारे करून दिला आहे. मलाही हा योग आला आहे. हे सदगृहस्थ असा परिचय करून देतात हे आश्चर्य नाही. ती 'जित्याची खोड ' समजून मी क्षम्य मानण्यास तयार आहे. पण ह्या माझ्या मित्राला मुद्दाम 'परिचय करून देण्यासाठी ' बोलावून नेणारे चाहते आहेत ह्याचे मात्र खरे