पान:वाटचाल (Vatchal).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६४ : वाटचाल

 व्याख्यानाला श्रोते कमी येणे, अगर आलेले श्रोते कंटाळा आल्याने उठून जाणे, ही काही मी वक्त्याची फजिती समजत नाही. माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या एका प्राध्यापक-मित्राने 'तुकाराम बीजे' च्या निमित्ताने पूर्ण दीडतास व्याख्यान दिलेले आहे. त्याला माझे दोन सहकारी-शिक्षक हेच फक्त श्रोते होते. दोघांनाही व्याख्यानात झोपण्याची सवय होती. दोन्ही श्रोते झोपलेले आणि वक्ता अस्खलित बोलतो आहे, याला सदृश प्रसंग पुन्हा येणार नाही असे मी समजत नाही व याला मी फजितीसुद्धा मानीत नाही. पण एके ठिकाणी मी अध्यक्ष, एक मित्र वक्ता, दोन श्रोते व एक सभा-चालक असे आम्ही पाचजण होतो. पैकी एका श्रोत्याचे घर शेजारीच होते. श्रोते नाहीत म्हणून सभा रद्द करावी असे सभा-चालकांचे मत होते. दोन्ही श्रोते ह्या भूमिकेला सहमत होते. माझा मात्र आग्रह असा की, श्रोते असोत वा नसोत सभा झाली पाहिजे. वक्ता गप्प होता. तो आपला चेहरा हसरा ठेवण्यासाठी घडपडत होता. इतक्यात ज्या श्रोत्याचे घर जवळ होते तो म्हणाला, " सभा रद्द करून जर माझ्या घरी चलाल तर चहा-पोहे देतो." लगेच आमचे वक्ते म्हणाले, " चला, सभा रद्द. मी तर चाललो. वाटल्यास तुम्ही बसा व सभा आटोपा. नाहीतरी वक्ता नसला तरी तुम्ही बोलताच. मग आजही तसेच समजा." ह्यानंतर चहापोहे झाले. आनंदात सगळेच होते. मी तेवढा चरफडत होतो. वक्त्याने अध्यक्षाची अशी फजिती केल्याचे प्रसंग फार येत नाहीत.
 आमचा मराठवाडा विभाग अजून पुण्या-मुंबईइतका प्रगत झालेला नाही. शहरी भागात टाळ्या वाजवून व्याख्यान बंद पाडतात, अगर श्रोते उठून जातात. पण अंडी, टोमॅटो वगैरे मारीत नाहीत. खेड्यात तर ऐन निवडणुकीतही बहुधा सभा उधळीत नाहीत. ग्रामीण भागात सभा रात्री असते. आधी गाणी वाजवून श्रोते जमा करतात. नंतर व्याख्यान. त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम असतो. स्त्रिया, मुले, तरुण, म्हातारे असा गच्च श्रोतृसमुदाय असतो. व्याख्यान चांगले असो, वाईट असो ही मंडळी उठून जात नाहीत. टाळ्या वाजवीत नाहीत. ती वक्त्याकडे लक्षच देत नाहीत. ती आपापसांत गप्पागोष्टी करीत बसलेली असतात. ह्या मंडळींसमोर व्याख्यान देणे म्हणजे खरी फजिती. तुम्ही विनोद करा, लोक हसत नाहीत. तुम्ही भावनाप्रधान आवेशयुक्त बोला, लोक प्रतिसाद देत नाहीत. रेडिओवर निदान आपले व्याख्यान उभा महाराष्ट्र ऐकतो आहे असा भ्रम असतो. इथे त्या भ्रमालाही जागा नसते. व्यवहारतः श्रोते गच्च भरलेले असतात. तत्त्वत: एकही श्रोता नसतो. त्यांच्यासमोर तासभर बोलणे म्हणजे काय, हे अनुभवाखेरीज कळणेच अशक्य. मधन मधून अध्यक्ष उभा राहून सांगतो, " बंधू-भगिनींनो, आजचे वक्ते फार विद्वान आहेत. त्यांचे व्याख्यान शांतपणे ऐकून घ्या.” एक-दोनदा सांगून मग अध्यक्षही चिडतात व ओरडून सांगतात, " बंधूभगिनींनो, तुम्ही शांत राहत नाही,