पान:वाटचाल (Vatchal).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६६ : वाटचाल

आश्चर्य वाटते.
 तरीही या परिचायकाचा त्रास फारसा नाही हे म्हटलेच आहे. कारण बहुधा लोक वक्त्यालाच त्याचा परिचय काय करून द्यावा, हे विचारतात आणि भाषणाचा मुख्य भाग आपल्या गावाचा आणि श्रोत्यांचा परिचय वक्त्याला करून देण्यासाठी वापरतात. खरा त्रास त्यांचा होत नाही. हा त्रास प्रामुख्याने अध्यक्षाचा होतो. हा अध्यक्ष वयस्कर, ज्येष्ठ व गावातील वृद्ध असतो आणि त्याच्यावर बधन घालणे फार कठीण असते. माझ्यासारख्या वक्त्याचा बाप, मामा इ. नातेवाईक अध्यक्षांच्या परिचयाचे असतात. त्याला वक्त्याच्या खाजगी जीवनाचीही माहिती असते. हा असा अध्यक्ष म्हणजे खरा सूड असतो. एके ठिकाणी मी शाकुंतलावर बोललो. दोन तासांच्या रसग्रहणपर व्याख्यानाचा समारोप करताना अध्यक्ष म्हणाले, "आजच्या वक्त्यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांचे वडील म्हणजे साधुपुरुष. सज्जन व प्रतिष्ठित वकील. आणि मामा (कै. डॉ. ना. गो. नांदापूरकर) म्हणजे काय ? अतिशय विद्वान व खानदानी देशपांडे, जुने वतनदार, शिवाय प्रोफेसर. त्यांचे पण हे भाचे हे अशा विषयावर बोलतात. आई-बापांना न विचारता, पोरा-पोरींनी केलेला प्रेमविवाह नामक गाढवपणा ह्यांना कौतुकाचा वाटतो. स्वतः प्रेमविवाह करून बापाचे नुकसान करणाऱ्याकडून ह्यापेक्षा दुसरे काय अपेक्षावे ? यांना शंकराचार्यावर बोलण्याची लाज वाटेल, ज्ञानेश्वरावर बोलण्याची लाज वाटेल, पण कालिदासावर बोलण्याचा हुरूप आहे-" इ. इ. आणि हा समारोप करणाऱ्यांच्याविषयी मला राग नाही. खरोखरी तो जुनाट विचारांचा वृद्ध माझ्यावर प्रेमही करीत होता व माझे कल्याण व्हावे ह्या प्रामाणिक बुद्धीनेच बोलत होता ह्याची मला खात्री आहे.
 नांदेड-औरंगाबाद-लातूर-जालना अशी शहरवजा मोठी खेडी सोडली तर इतर भागात वक्त्यावर गुदरणारे प्रसंग शहरभागातील प्रसंगांपेक्षा फार निराळे असतात. त्यांची काही उदाहरणे मी मुद्दामच दिली. बोलणाऱ्याची नेहमी फजिती होतेच असेही नाही. आणि वर सांगितली तितकीच माझ्या फजितीची पूर्ण कहाणी आहे असेही नाही. पण सगळा भात उकरून पाहण्याची गरज नाही. चार शिते पाहिली म्हणजे पुरे. ह्या सगळ्या प्रकारानंतर वक्ते वक्त्यांचा मार्मिक सूड कसा घेतात त्याचे एक उदाहरण सांगून हा ' आत्मघातकी उद्योग' थांबवितो.
 माझ्या मित्रमंडळीत एक आगरकरांचे चाहते व अभिमानी मित्र होते. होते म्हणण्याचे कारण असे की, ते गृहस्थ अजून आहेत, पण आता ते माझे मित्र नाहीत. ज्या कारणाने आमची आपापसांतील मैत्री तुटली, ते कारण व तो प्रसंग असा आहे: ते माझे मित्र नेहमी म्हणावयाचे, " आपण आगरकर पुण्यतिथीचा कार्यक्रम घेऊ." कार्यक्रम घेण्यास माझी हरकत नव्हती. पण माझ्या ह्या मित्राला कार्यक्रम विशिष्ट