पान:वाटचाल (Vatchal).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पूर्वपक्ष-उत्तरपक्ष : ६३

जाहीर करू नका." जर श्रोते खूप जमले, गर्दी असली, तर हे अचानक उठून सांगतील, " ठीक, मी जरा बोलून घेतो." आणि नंतर मनसोक्त बोलून घेतात. आता माझा हा मित्र नेहमी व्याख्यानाच्या गमती म्हणून, 'आपण बोलतो' म्हणताच सभाचालकांचा चेहरा कसा पडला, आपण उभे राहताच लोकांची कशी जिरली व श्रोते उठून जाऊ लागल्यामुळे उरलेल्या वक्त्यांचे कसे भरीत झाले, ह्या आठवणी सांगतो. महान कलावंतांच्या ठिकाणीसुद्धा क्वचित आढळणाऱ्या ह्या, ' स्वानुभवाशी श्रेष्ठ कलात्मक तटस्थता' साधणाऱ्या महापुरुषाला वंदन करून मी काही माझे फजितीचे प्रसंग सांगतो व हे सर्व प्रसंग साधुसंतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पुण्यभूमीतील म्हणजे मराठवाड्यातीलच आहेत हेही सांगतो.
 मनात एक विचार असा आला आहे की, आपली फजिती फक्त व्याख्यान देण्यास गेल्यानेच होते असे नाही इतरांची व्याख्याने ऐकताना, शंका विचारताना, होणान्या गमती काही कमी नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हिंदू कोड बिल' त्या वेळच्या संसदेला सादर केले होते तेव्हाची एक गोष्ट. ठिकठिकाणी शास्त्रीपंडित मंडळी ह्या विलाविरुद्ध व्याख्याने देत होती. एक शास्त्री आमच्या गावीही आले होते. ते दररोज एक तास व्याख्यान देत. नंतर एक तास शंकासमाधान असे. शंका विचारण्यास कुणी मुलगा उभा राहिला की म्हणत, " अरे बाळ ! खाली बस. अजून ओठावर केस उगवले नाहीत रे तुझ्या-आणि उद्घटा, त्रिकालज्ञ ऋषीच्या प्रतिपादनावर शंका घेतोस ?" इ. इ. त्यांना काहीजण तोंडी शंका विचारीत. काही लेखी विचारीत. एके दिवशी ते दुसऱ्या एकाचे शंकासमाधान करीत होते आणि मी एक लेखी शंका त्यांच्या हाती दिली. सभेच्या दुसऱ्या टोकाला जाऊन उभा राहिलो शंकासमाधान संपल्यावर शास्त्रीबुवांनी माझी चिठ्ठी उघडली व माझी शंका वाचली. त्याबरोबर ते एकदम संतापाने लाल झाले. उठून उभे राहून म्हणाले, " हरामखोरा, इकडे ये." मी म्हटले," आपण उत्तर द्या, मी इथूनच ऐकतो." शास्त्रीबुवा रागाने थरथरत होते. त्यांचा तोल सुटला व ते आसन सोडून माझ्याकडे येऊ लागले. मी सभास्थान सोडून पळून गेलो. त्या दिवशीची सभा तेथेच संपली. लोकांनी शास्त्रीबुवांना विचारले, “ प्रश्न काय आहे ?" पण शास्त्रीबुवांनी कुणाला प्रश्न सांगितला नाही व व्याख्यानाची जागा सोडून मला पळून जावे लागले म्हणून मी वाचलो. नाहीतर मला मार खावा लागला असता. ही माझी फजितीच नाही का ? ह्या प्रश्नाचे उत्तर मला अजून सापडत नाही. कुणातरी प्रतिभा व प्रज्ञा एकत्र जमलेल्या विद्वानालाच हे उत्तर विचारले पाहिजे. शास्त्रीबुवांनी प्रश्न काय होता हे कुणालाच सांगितले नाही. मीही त्या वेळी कुणालाच सांगितले नाही. प्रश्न असा होता, " त्रिकालज्ञ ऋषींच्या प्रतिपादनावर शंका येण्यासाठी फक्त ओठावर वगैरे केस उगवणे पुरते, की अजून काही अटी आहेत ?"