पान:वाटचाल (Vatchal).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझा ग्रंथसंग्रह नाही ! : ६१

ऋणी आहे. त्यांच्या आधारेच क्रमिक पुस्तके वाचण्याच्या कंटाळयावर मी मात करू शकलो. मी माझ्या विद्यार्थ्यांना माझे अनुकरण मुळीच करू नका, असे सतत सांगतो याचे महत्त्वाचे एक कारणच हे आहे की, परीक्षांचा मला मनस्वी कंटाळा आहे, आणि विद्यार्थी परीक्षेसाठी तयार करणे हा माझा जगण्याचा धंदा आहे.
 मी उपलब्ध असेल ते वाचतो. दुर्मीळ पुस्तकांचा मुद्दाम मी पाठलाग करीत नाही. पण कधी कधी तोही उद्योग करणे भाग पडते. दोन वर्षांपूर्वी ' मनुस्मृती'चा मी अभ्यास करीत होतो. मूळ मनुस्मृती भाष्यासह वाचणे, इतरांचे मनुस्मृतीवरील विवेचन वाचणे हे तर चालू होतेच. पण एक नोंद अशी सापडली की, जनार्दन महादेव गुर्जर यांनी इ. स. १८७७ मध्ये मनुस्मृतीचे भाषांतर मुंबईतून प्रसिद्ध केले. माझ्या माहितीनुसार हे मनुस्मृतीचे पहिले मराठी भाषांतर आहे. आधुनिक राजकीय, सामाजिक जाणिवांचे फारसे संस्कार ज्या मनावर झालेले नाहीत त्यांनी मनुस्मृतीचा अर्थ कसा लावला हे पाहण्याची प्रबळ जिज्ञासा माझ्या मनात निर्माण झाली. इ. स. १८७७ म्हणजे काही फार जुना काळ नाही आणि गुर्जर म्हणजे काही मनुस्मृतीवरचे फार मोठे अधिकारी नाहीत, हेही मला कळत होते. गुर्जर कुल्लुकभट्टाला अनुसरूनच अर्थ लावणार. त्यात वेगळे काही असणार नाही. फरक फवत १९ व्या शतकातील शास्त्रीमंडळीची संस्कृतप्रचुर मराठी व आजची प्रौढ मराठी इतकाच असणार हेही मला कळत होते. पण मला गुर्जरांचे भाषांतर हवे होते. माझ्या मित्रांना, विद्यार्थ्यांना मी कल्पना दिली. हस्तेपरहस्ते या ग्रंथाचा शोध सुरू झाला. जुनी ग्रंथालये, जुन्या पुस्तकांचे संग्राहक, यांच्याकडे शोधाशोध झाली. धावपळ, यातायात दुसरेच करीत होते. मी फक्त घरी मला ग्रंथ हवा म्हणून सांगत होतो. माझ्या बाबतीत पुष्कळदा असे होते. मला गायकवाड मालेतील अभिनव भारतीसह असणारा नाट्यशास्त्राचा दुसरा खंड हवा होता. एकाने सदर ग्रंथ नांदेडमध्ये कुठेही उपलब्ध नाही ही माहिती आणली. माझे त्या वेळचे प्राचार्य के. रं. शिरवाडकर यांनी विद्यापीठात जाऊन तिथे तो खंड शोधला व मला आणून दिला आणि विचारले, 'बोला, अजून काय हवे?' हाच प्रकार मनुस्मृतीबाबत होणार असे माझे अनुमान होते. सहा महिने इथे नाही तिथे नाही चालले होते. यातायात करणारे करीत होते. मी फक्त अधिकच हटवादीपणे मला गुर्जरकृत भाषांतर हवे म्हणन सांगत होतो. एक दिवस माझे गुरुतुल्य मित्र एकनाथ महाराज खडकेकर यांनी ते भाषांतर समोर आणून ठेवले. सांगण्याचा मुद्दा इतकाच की दुर्मीळ पुस्तकासाठी प्रयत्न करण्याचा योग इच्छा नसली तरी मधूनमधून येतोच.
 मी वाचावे, मी अभ्यास करावा, मी लिहावे यांसाठी झटणारे शंभरजण भोवती असतात. म्हणून माझे निभून जाते. ग्रंथसंग्रह नसला तरी चालते. इतरांना हा भाग्ययोग कसा येणार?