पान:वाटचाल (Vatchal).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६० : वाटचाल

मनोरंजक व मन भारून टाकणारे वाटले. प्रत्येक खंडाबाबतची टाचणे तयार केली. आणि पुन्हा स्वामीजी नांदेडला येताच त्यांच्याकडे जाऊन मी ग्रंथ वाचला याची खात्री पटवली. त्यांना अर्थातच आनंद झाला. थट्टेवारी सारे न्यावे तसे ते म्हणाले, " कुरुंदकर, असे वाचायचे नसते. फक्त वाचतो म्हणून आश्वासन द्यायचे असते."
 मी पू. स्वामीजींना एक शंका विचारली. मी म्हटले, "समजा, सारे खंड वाचून हा ग्रंथ सामान्य आहे असे माझे मत झाले असते तर मग हे पैसे वायाच गेले असते की नाही ?" स्वामीजी म्हणाले, “ विचारातील मुख्य चूक इथे आहे. पुस्तके पूर्णपणे वाचून ती वाईट असे जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा तुमची समृद्धी वाढलेली असते. त्यात ग्रंथाची किंमत वसूल झाली. मात्र हा नियम ज्याच्या जिज्ञासूपणावर माझा विश्वास आहे त्याच्यापुरता समजायचा."
 लहानपणापासून माझा वाचनाचा नाद वाढविणारे माझे वडील अंबादासराव कुरुंदकर, मामा डॉ. नांदापूरकर, गुरुवर्य कहाळेकर, नांदेडला एस. आर. गुरुजी इ. ची माया ही माझ्या जमेची बाजू म्हटली पाहिजे. आणि 'तुला हवे ते पुस्तक नेऊन वाच व नंतर कॉलेजात दाखल कर असे सांगणारे पू. स्वामीजी, कै. जीवनराव बोधनकर, माझे प्राचार्य के. र. शिरवाडकर हीही जमेचीच बाजू म्हटली पाहिजे. या सर्व महाभागांच्यामुळे मी अधाशी वाचक झालो हे तर खरेच, पण या मंडळींच्या माझ्यावरील प्रेमाचा परिणाम असा झाला की, आपला ग्रंथसंग्रह असावा असे मला कधी तीव्रपणे वाटलेच नाही.
 परीक्षा आणि परीक्षेचे पुस्तक वाचण्याचा मला प्रचंड कंटाळा व नावड आहे. परीक्षेच्या निमित्ताने वाचन होते. अभ्यास होतो असे माझे अनेक मित्र म्हणतात. त्या सर्वांचे सदैव कल्याण असो. मी परीक्षा टाळत आलो आहे. नाइलाजाने मला एम. ए. व्हावे लागले. माझा एम. ए. चा निकाल लागला त्या वेळी मोठ्या उल्हासाने मी डोक्याचा तुळतुळीत गोटा केला आणि विहिरीवर बसून थंड पाण्याने स्नान केले. मित्रांनी विचारले, " अरे हा काय नवा प्रकार?" मी म्हटले, " सुटलो. आजपासून परीक्षा माझ्या जीवनात मेली !" परीक्षेचे पुस्तक मी वाचू लागलो की, जांभया येतात. झोप येऊ लागते. परीक्षेचे पुस्तक वाचणे मला फार कष्टाचे जाते. मग मी त्यावरही उपाय शोधलेले होते. बी. ए. च्या परीक्षेच्या वेळी मी देवीप्रसाद चटोपाध्यायांचे 'लोकायत' हे प्रसिद्ध पुस्तक जवळ ठेवले होते. सुमारे तासभर क्रमिक पुस्तक वाचले की, झोप दाटून येई. मग मी ' लोकायत ' वाचत असे. झोप तातडीने उडून जाई. ताजातवाना झालो की क्रमिक पुस्तक. ह्या दृष्टीने प्रो. दासगुप्ता ह्यांच्या भारतीय तत्त्वज्ञानेतिहासाचे खंड, काणे यांचा 'धर्मशास्त्राचा इतिहास', राहूल सांकृत्यायन यांचे 'मध्य आशियाचा इतिहास', इत्यादी ग्रंथांचा, मला माझी क्रमिक पुस्तके वाचता यावीत यासाठी फार उपयोग झाला. ह्या सर्व ज्ञानर्षीचा मी फार