पान:वाटचाल (Vatchal).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझा ग्रंथसंग्रह नाही ! : ५९

कुणी उचलून नेला नाही. तर ग्रंथ माझ्याकडे उरतो. थोडक्यात म्हणजे, माझा ग्रंथसंग्रह नाही. ती सवयच मला लागली नाही.
 झालेले हे चांगले की वाईट याबाबत माझे उत्तर स्पष्ट आहे. हे वाईट आहे. त्याज्य आहे. चांगले नाही. पण जर एखादा दोष आपल्यात असेल तर तो का झाकावा ? सत्य सांगणेच भाग आहे. माझ्या विद्यार्थ्यांना, मित्रांना माझा नेहमी सल्ला असतो की, कृपया, चांगले व्हा. माझ्यासारखे होऊ नका. मी अनुकरणीय नाही.
 वरील विवेचनाचा अर्थ पुस्तकांनी मला झपाटले नाही अगर दुर्मीळ पुस्तकांच्या शोधार्थ मी धडपडलो नाही, असा मात्र करायचा नाही. याचा अर्थ इतकाच की जे मिळत गेले ते वाचण्यावर माझा भर राहिला. मुद्दाम दुर्मीळ पुस्तकांच्या नादी मी लागलो नाही. पण कधी कधी तेही करावे लागतेच. यामुळे या संदर्भातील काही गमतीदार व सहज आठवणाऱ्या आठवणी नमूद करतो. त्यांच्याकडे गंमत म्हणून पहायचे. फार गंभीरपणे पाहायचे नाही.
 मी ' पीपल्स कॉलेज ' नांदेड येथे इ. स. १९६३ साली प्राध्यापक म्हणून नोकरीस लागलो. त्या वर्षीची एक गोष्ट आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष पू. स्वामी रामानंदतीर्थ कॉलेज पाहावयास आले होते. माझी व त्यांची जुनी ओळख. फक्त नव्यानं प्राध्यापक झालो होतो. त्याच वेळी एक पुस्तकविक्रेता आला होता. त्याच्याजवळ विल ड्यूराँटने लिहिलेला संस्कृतीचा इतिहास होता. अनेक दिवस मी त्या ग्रंथाचे नाव ऐकत होतो. टायन्बीचा इतिहास विश्लेषण करणारा महाग्रंथ आणि ड्यूराँटचा हा ग्रंथ (मूळ नाव स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन, एकूण खंड १०) वाचण्याची मला जिज्ञासा होती आणि नांदेडला हे खंड उपलब्ध नव्हते. अनपेक्षितपण हवा असणारा ग्रंथ घरात-दारात येऊन उभा ठाकला. मी पू स्वामीजींना म्हटले, " हा फार प्रसिद्ध ग्रंथ आहे. आपल्या महाविद्यालयासाठी विकत घ्या." स्वामीजी म्हणाले, " ग्रंथ पूर्ण नाहीत. (आमच्या विक्रेत्याकडे पहिले सात खंडच होते.) दुसरे कुणीतरी वाचून तो चांगला आहे, असे म्हटले पाहिजे. न वाचता चांगले म्हणणाऱ्याला महत्त्व कोण देणार ? तिसरे म्हणजे इथे तरी हा ग्रंथ वाचणार कोण ? शेवटचे म्हणजे किमतीचे काय ?"
 मी म्हणालो, "स्वामीजी, किमतीचे तुम्ही पहा. संपूर्ण ग्रंथ वाचण्याची जवाबदारी माझी. वाचून झाल्यानंतर मी तुम्हांला माझे मत सांगतो.' स्वामीजींनी हे मान्य केले आणि प्राचार्यांना ' ग्रंथ खरेदी करा, म्हणून सांगितले. पुस्तक विकत ध्या म्हणून सांगणे सोपे असते. सुमारे पाच हजार पाने वाचण्याची जबाबदारी घेणे कठीण असते. ग्रंथ अतिशय चांगला, माहितीपूर्ण, रेखीव इ. मी ऐकून होतो. पण वाचनीयतेचे काय ? माझा महाविद्यालयीन उद्योग संभाळून मी तीन महिन्यांत सातही खंड वाचून संपविले, निदान मला तरी ते सारे लिखाण कादंबरीप्रमाणे