पान:वाटचाल (Vatchal).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझी लेखन उमेदवारी : ५७

नवोदित लेखक आहा, नवोदित लेखकाला आपल्या साहित्याचे काय झाले याचा उत्साह फार असतो. म्हणून तातडीने कळवीत आहे. लेख स्वीकारलेला आहे. यथावकाश प्रसिद्ध होईल." नवोदितांची इतकी चिंता वाहणारे फार दुर्मीळ. जावडेकरांच्या पत्राने मला फार आनंद झाला. 'नवभारत'चे संपादक म्हणजे मामा नव्हेत की चाहते नव्हेत; शिवाय ते मराठवाड्यातील मासिकही नव्हे. 'नवभारत' मासिक माझा लेख छापते हे तरी गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानाल की नाही, हा प्रश्न कहाळेकरांना विचारायचे मी ठरवत होतो, त्या वेळी मी होतो वडिलांच्याकडे वसमतला आणि कहाळेकर हैद्राबादला.
 त्या काळी मौज साप्ताहिकाला साहित्याच्या दरबारी प्रतिष्ठा फार. दिवाळी अंकाच्या मधून आलेल्या लिखाणाचा आढावा 'मौज' घेत असे. जावडेकरांचे पत्र आले आणि दोन दिवसांनी मौजेचा अंक आला. मौजेच्या परीक्षणकाराने माझ्या शरदबाबूंच्या वरील लेखाची मनमोकळेपणाने स्तुती करून तो दिवाळी अंकाच्या मधील एक अतिशय चांगला लेख म्हणून वाखाणला. पाठोपाठ मित्रांची अभिनंदने सुरू झाली. तु. शं. कुळकर्णीचे एक अती भलावण करणारे पत्र आले. कारण ते प्रिय मित्र.
 भेट झाल्यावर कहाळेकर म्हणाले, "आपण लिहितो ते छापण्याजोगे, वाचण्याजोगे आहे असे लोक मानू लागले, इतकाच या घटनांचा सौम्य अर्थ आहे. कुणी मोकळेपणाने कौतुक करू लागला तर तो त्या माणसाचा मोठेपणा. तो आपण मानावा. स्तुती खरी मानू नये." पण कहाळेकर काहीही म्हणाले तरी मला चढायचे ते बेतालपण चढले होते. कहाळेकर स्वतः सुखावले होते. मी फार बेताल होऊ नये यासाठी जपत होते. हे मलाही कळले. डिसेंबर १९५४ सालीच ह्या घटना घडल्या तेव्हा माझे २३ वे वर्ष चालू होते. म्हणजे मी अपक्वच होतो. पण पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई ही ठिकाणे आपली उपेक्षा करतात, आपल्यावर अन्याय करतात असे पुढच्या जीवनात मला कधीही जाणवले नाही. त्याचे कारण आरंभापासूनच झालेले माझे कौतुक हेच असणार, असे मला वाटते. गैरसमज बळकट असावेत यासाठी कारण लागत नाही. वातावरण पुरते. वातावरण असूनही गैरसमज नसावेत याला मात्र कारण लागते, असा याचा अर्थ घेता येईल.