पान:वाटचाल (Vatchal).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५६ : वाटचाल

२० व्या वर्षी लेखनारंभ करणारी मंडळी २२ व्या वर्षी आपले लिखाण कुणी छापत नाही म्हणून संतापतात, वैतागतात तेव्हा मी ११ वर्षांची पायपीट समजावून सांगतो. त्यांचे दुःख दूर करण्याचा हाच एक मार्ग मला उपलब्ध असतो.
 माझ्या जीवनात अती उत्साहावर पाणी ओतणारे गुरुजन मला लाभले हे मी माझे भाग्य समजतो. पराभवाने नाउमेद न होणारे आणि विजयाने बेताल न होणारे मन संपूर्णपणे मला मिळालेले नाही. ती दशा स्थितप्रज्ञाची म्हणावयाची. पण काही प्रमाणात हे मन मजजवळ आहे, ही कृपा गुरुजनांची. माझा पहिला लेख प्रकाशित झाला डिसेंबर १९५३ मध्ये. ते एक ग्रंथपरीक्षण होते. माझे एक गुरू न. शे. पोहनेरकर यांनी 'विरलेल्या गारा' या नावाचे व्यक्तिचित्रांचे पुस्तक लिहिले होते. मामा के. नांदापूरकर 'प्रतिष्ठान' या मराठवाडा साहित्यपरिषदेच्या मुखपत्राचे संपादक होते. गुरुवर्य भालचंद्र महाराज कहाळेकरांनी परीक्षण लिहिण्यास सांगितले. ते मी लिहिले. कहाळेकरांनी तपासून दिले व मग 'प्रतिष्ठान'मध्ये नांदापूरकरांनी ते छापले. आपला लेख छापला गेलेला पाहण्यात एक आनंद असतो. नवीन लेखकांना तर तो आनंद फार असतो. आनंद मलाही खूप झाला. पण कहाळेकर म्हणाले, " लेख छापून आला. बरे झाले, वाचणार कोण ? जे जे छापले जाते ते ते वाचले जातेच असे नाही. आपला लेख अनेकांना वाचण्याजोगा वाटला पाहिजे. जर कुणी वाचणारच नसेल तर मग लेख मामांच्या मासिकात छापला जातो याचे महत्त्व तरी किती?" कहाळेकरांनी असे आनंदावर पाणी ओतले. आज असे वाटते की, हा उतारा नव्या लेखकांना फार आवश्यक असतो. प्रसिद्धीची नशा फार लवकर चढते. ती लेखकाचा नाश करते.
 यानंतर फार आनंददायक असे प्रसंग पुढच्या दोन वर्षांत आले. त्यांतील प्रमुख दोन प्रसंगांचा ठसा माझ्या मनावर आज पंचवीस वर्षे अबाधित आहे. कदाचित तो ठसा जन्मभर राहील. डिसेंबर १९५३ नंतरही मी लिहीत होतोच. एक लेख सप्टेंबर १९५४ ला लिहिला आणि मराठवाडा' दिवाळी अंकात तो दिला. शरदचंद्रांच्या कादंबऱ्यांविषयी तो लेख आहे. १९५४ सालच्या मराठवाडा' दिवाळी अंकात तो लेख छापला गेला आहे. मराठवाड्याचे संपादक : अनंत भालेराव माझे मामा नव्हते. तसे नातेवाईकही नव्हते पण माझे कौतुक करणारे आप्तच होते. शिवाय भालेराव हे कहाळेकरांचे मित्र. " आपली माणसे कौतुक करणारच इथे दर्जाचा प्रश्नच काय ?" असे कहाळेकर म्हणणार, ह्याची मला खात्री होतीच. नोव्हेंबर १९५४ अखेर एक लेख मी लिहिला आणि तो 'नवभारत' मासिकाला पाठवला. त्या वेळी 'नवभारत'चे संपादक जावडेकर होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचार्य शं. दा. जावडेकरांचे मला पत्र आले. जावडेकरांनी लिहिले होते, "तुमचे नाव कुठे वाचलेले स्मरत नाही. अनुमान असे की, तुम्ही तरुण