पान:वाटचाल (Vatchal).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझी लेखन उमेदवारी : ५५

डोळयांना उपमा कोणत्या देतात ?" मामा म्हणाले, " हरीणशावकाचे डोळे, मासोळी, कमळ, अशा उपमा देतात." मी म्हटले, " कमळ ही उपमा देतात, मग शेवंती, गुलाब का नको?" मी काय विचारतो आहे हे बहुधा मामांना त्या क्षणी लक्षात आले नाही म्हणा, वा त्यांना थट्टेची लहर आली म्हणा; ते म्हणाले, " हरकत काहीच नाही, ती नवी कल्पना ठरेल." आणि मी मनाशी पक्का निर्णय घेतला की, कवितेतील माझ्या प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्यासारखे आहेत.
 अनुभव नसताना कुणाचे तरी अनुकरण करून काहीतरी लिहिणे हा हौशी नवोदित लेखकाचा उद्योग असतो. माझे वय दहाच वर्षांचे असले तरी मी हौशी व उदयेच्छू लेखक होतो. यमके जुळवीत मोठ्या प्रयत्नाने मी कविता केली आणि 'वसंत' मासिकाला पाठविली. आपली कविता या अंकात येईल, त्या अंकात येईल म्हणून मी वाट पाहत राहिलो. मोठ्या दृढतेने माझे गुपित मी जतन केलेले होते. तीन महिन्यांनंतर मात्र मी रडकुंडीला आलो व मग दमादमाने मामांना सारे सांगितले. डॉ. नांदापूरकर मला 'आचार्य' म्हणत. ते म्हणाले, “ आचार्य, थोडे दमाने घ्या. परतीचे पोस्टेज होते का कवितेस ते सांगा. पत्ता बरोबर होता का, ते सांगा. आणि दर मासिकाकडे दरमहा किती कविता शेकड्याने येतात, त्याची कल्पना आहे का तेही सांगा." या विषयात आपणास अजून खूप शिकणे आहे याची मला जाणीव झाली. नाकारले गेलेले ते माझे पहिले साहित्य. ती कविता होती.
 इथून पुढे अकरा वर्षे मधूनमधून मी मासिकांना काही ना काही पाठवीतच होतो. सगळेच लिखाण रद्दी होते असे मला वाटत नाही. पण फार चांगले असे त्यात काही नव्हते. क्वचित बऱ्यापैकी, क्वचित सुमार, पण प्राय, रद्दी असेच ते लिखाण होते. कविता, कथा, ललितनिबंध, ग्रंथपरीक्षण, वैचारिक लिखाण असे विविध प्रकार या लिखाणात होते. 'यांपैकी' एकही लेख, कविता कधी प्रकाशित झाली नाही. दुःखात सुख असेल तर ते हे आहे की, ज्यांनी माझे लिखाण नाकारले ती फार नामवंत नियतकालिके होती. सामान्यांना मी लिखाण पाठवीत नव्हतो. नामवंत माझे लिखाण छापत नव्हते. ही तपश्चर्या अकरा वर्षे चालली होती.
 अनेकदा, साभार परतीच्या वाळवंटातून मी फार दीर्घ प्रवास केलेला आहे, हे माझ्या मित्रांच्या व विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही. वयाची पंचविशी गाठण्यापूर्वीच माझे 'मुंबई मराठी साहित्य संघा'त भाषण झाले. 'सत्यकथे'त लेख आले. पुण्याला व्याख्यान झाले. साहित्य संमेलनातून मी परिसंवादाचा वक्ता होतो. आणि हे घडले तेव्हा मी पदवीधरही नव्हतो. प्राध्यापकही नव्हतो. मराठवाड्यातील लेखकांच्यामध्ये अल्पवयातच प्रतिष्ठा मिळालेला मी लेखक. तेव्हा मलाही साभार परतीचे धक्के वर्षानुवर्षे खावे लागले असतील हे कुणाच्या ध्यानीमनी नसते. १८