पान:वाटचाल (Vatchal).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझी लेखन उमेदवारी


प्रकाशनासाठी पाठविलेले माझे पहिले साहित्य म्हणजे एक कविता होती. वयाच्या दहाव्या वर्षी मी मराठी पाचव्या इयत्तेत शिकत होतो. या वयात प्रेमकविता लिहिण्याचे काहीच कारण नव्हते. पण लिहिली.आजही तिच्यातील एक कल्पना मला आठवते. त्या कवितेत प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्याप्रमाणे आहेत अशी नोंद होती. माझे मामा मराठीचे हैद्राबादमधील नामांकित प्राध्यापक होते. ते नेहमी नवनवीन कल्पनाविलासाचे उल्हासाने स्वागत करीत. त्यामुळे कल्पना नवीन असली पाहिजे हा माझा आग्रह होता. माझे मामा डॉ. नांदापूरकर मराठी कविता विद्यार्थ्यांना शिकवतात ती आधुनिक मराठी कविता आहे. ते केशवसुत, बालकवी इ. ची चर्चा कर-

ताना जुन्या मराठी कवितेपेक्षा आधुनिक मराठी कविता निराळी कशी आहे, हे सांगतात. नवीन कल्पनाविलास हा या विवेचनाचा भाग आहे हे मला त्या वेळी नीटसे कळलेच नव्हते. एक मुद्दा लक्षात आला होता तो म्हणजे कल्पनाविलास नवा हवा. ज्याला मामा आधुनिक मराठी कविता म्हणतात ती आपल्या जन्मापूर्वी पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आहे हेही त्या वेळी मला कळले नव्हते. खांडेकरांची 'हिरवा चाफा' ही कादंबरी नुकतीच वाचलेली होती. हे एका फुलाचे नाव असून या फुलाचा वास मोठा मादक असतो इतके मला माहीत होते. मामांना आपल्या भाच्याचे कौतुक फार होते. कारण मी वाचन खूप करीत असे. मी मामांना विचारले, "स्त्री च्या