पान:वाटचाल (Vatchal).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संगीताचा नाद : ५१

वळविले. एक डग्गा मी फोडला, मग ते त्रस्त झाले. इतके तरी गुरुजींनी का सहन केले असावे ? बहुतेक रोख फी आगाऊ देणारा मी एकटाच विद्यार्थी होतो, हे त्याचे कारण असावे. पण रोख वेळेवर फी मिळते हा मोहसुद्धा माझ्या गुरुजींना दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ परवडला नाही. या अपवाद असणाऱ्या प्रसंगामुळे फक्त नियमच सिद्ध होणार. संगीत हा माझा मूळच्या आवडीचा विषय नव्हे. संगीताच्या बाबत मी असा अलमगीर बादशहाचा नातेवाईक ! मग मी संगीताकडे वळलो कसा ? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर थोडक्यात असे देता येईल की, अण्णासाहेब गुंजकराच्यामुळे मी संगीताकडे वळलो. गुंजकरांनासुद्धा याची नक्की कल्पना असेलच असे नाही.
 माझे विद्यागुरू कै. भालचंद्रमहाराज कहाळेकर हे नाईक वाड्यात गोळीगुडा येथे राहत असत. वाचन व चर्चा या निमित्ताने माझा कहाळेकरांच्याकडे जवळजवळ मुक्कामच होता. कहाळेकरांचे मित्र (आता भाग्यनगर नांदेड येथे माझे शेजारी) श्री. रामभाऊ पिंगळीकर हे अण्णासाहेबांचे शिष्य. गायनवादन विद्यालयातून बाहेर पडलेल्या पहिल्या पहिल्या विद्यार्थ्यांच्या पैकी ते एक. रामभाऊ पिंगळीकर कवी होते. संगीताचे फार चांगले जाणकार व नादी होते. हैद्राबादची सारी गुणी मंडळी त्यांच्याकडे जमत. प्रसिद्ध तबलानवाज उस्ताद दाउदखां त्यांपैकी एक ! कधी कधी प्रसिद्ध पेटीवादक अंबाप्रसादही तिथे येत आणि मग गायकांचा एक मेळावाच तिथे जमे. शनिवारी रात्री ९||-१० पासून गाणे सुरू व्हायचे ते सकाळी पाच-सहापर्यंत. गाणे, गाण्यावर गप्पा-विनोद असा सगळा प्रकार सकाळपर्यंत चाले. चहाही तीन वेळा होई. सकाळी तोंड धऊन चहा पिऊनच घरी परतायचे. या मैफिलीत मित्रासाठी म्हणून कहाळेकर असत. कहाळेकरांची शागीर्दी करीत, आम्ही असू.
 रामभाऊ पिंगळीकरांच्या घरी 'उगी कटकट, डोक्याला ताप' अशी कुरकुर करीत मी कहाळेकरांच्यासह असे. हळूहळू मीच संगीतात रमू लागलो. पिंगळीकरांची तान मोठी जोरकस व दाणेदार असायची. त्या तानेची आवड प्रथम निर्माण झाली. तानेकडून मग आलापीकडे मी क्रमाने आकृष्ट झालो. रामभाऊंच्या नादाने कहाळेकर, त्यांच्या नादाने मी असे गाण्याच्या कार्यक्रमासही जाऊ लागलो. कृष्णराव चोणकर, हिराबाई बडोदेकर इ. चे गाणे मी असे ऐकले. रामभाऊ पिंगळीकरांच्यामुळे मी संगीताच्या जगात प्रथम आलो. गुंजकरांच्या शिष्याचा हा माझ्या गुरूमुळे झालेला माझ्यावरील संस्कार म्हटला पाहिजे. या काळात मी हैद्राबादला होतो. अजून नांदेडला माझा व मला नांदेडचा उपद्रव नव्हता.
 ही संगीताची गोडी इ. स. १९५४ साली सतत तीन दिवस, दिवसा-रात्री, पहिल्या मराठवाडा-संगीत संमेलनात कार्यक्रम ऐकण्याइतकी गाढ झाली होती. हे