पान:वाटचाल (Vatchal).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५२ : वाटचाल

संमेलन नांदेडला झाले. कुमार गंधर्वांचे गाणे मी प्रथम इथेच ऐकले. बसवराज राजगुरूंचे गाणेही इथेच ऐकले. पण नांदेडच्या पहिल्या संगीत संमेलनाचा माझ्यावरील मुख्य ठसा याहून निराळा आहे. गाणे मी ऐकले, ते मला आवडले हे तर खरेच; पण त्याहून विशेष जाणवले ते निराळेच होते.
 मराठवाड्यातील एका गावी तीन-साडेतीन हजार श्रोते दिवसा आठ तास आणि रात्री सहा तास असे रोजी चौदा तास शास्त्रीय संगीत हौसेने ऐकत बसू शकतात एवढी मोठी अभिजात संगीताची गोडी व रसिकता असणारा श्रोतृवर्ग इथे उपलब्ध आहे, हे मला प्रथमच जाणवत होते. सुगम संगीताचा कार्यक्रमसुद्धा तीन-चार तासांच्या नंतर कंटाळवाणा होतो हे मी रोज पाहत होतो. पैसे देऊन हौसेने, तक्रार न करता शास्त्रीय संगीत ऐकत बसणारे हे शेकडो लोक पाहणे याचा माझ्या मनावर फार खोल परिणाम झाला. इ. स. १९५४ साली पुढच्या वर्षी आपण नांदेडला नोकरीसाठी जाऊ आणि नंतर नांदेड हीच आपली कर्मभूमी होईल याची मला कल्पना नव्हती; पण मराठवाड्यातील रसिकांच्या या गर्दीचे आपण देणे लागतो याची मात्र मला जाणीव नव्याने झाली होती. दुसरी जाणवलेली बाब म्हणजे वाद्य, वादक व गायक यांची मराठवाडाभर पसरलेली लक्षणीय संख्या. माझ्या मनावर पहिल्या संगीत संमेलनाचा सर्वांत गाढ ठसा या जाणिवेचा आहे.
 रामभाऊ पिंगळीकरांच्या मैफलीत मला प्रथम संगीताची गोडी लागली. हा काळ इ. स. १९५० चा! माझे गुरू कहाळेकर या बाबतीत अतिशय जागरूक होते. मला संगीताची गोडी लागते आहे, हे पाहताच त्यांनी संगीतावर माझ्याकडून काही वाचून घेण्यास, चर्चा करण्यास आरंभ केला. संगीतावरील प्राथमिक वाचन मी कहाळेकरांच्या सहवासातच केले. पिंगळीकरांचे एक फार चांगले होते. ते जरी स्वतः चांगले गायक व शास्त्रीय संगीताचे जाणते उपासक होते, तरी त्यांच्याजवळ कोणतीही गटबंदी नव्हती, कोणत्याही घराण्याचा चांगला गायक व कोणत्याच घराण्याचा नसलेला चांगला गायक त्यांना आवडे. शास्त्रीय संगीताप्रमाणेच भजन, लावणी, नाटयगीत, सिनेसंगीत यांचे ते चाहते होते. यामुळे कोणताही कर्मठपणा नसणारी मोकळी रसिकता मला आरंभापासून उपलब्ध झाली. अगदी आरंभापासून जे चांगले, त्या संगीताचा, मी चाहता झालो. पिंगळीकरांनी मला संगीताची गोडी लावली, मुक्त रसिकता दिली. कहाळेकरांनी माझी रसिकता डोळस केली.
 ही सारी पूर्वतयारी सोबत घेऊनच नांदेडला मी नोकरीसाठी आलो. नांदेड मोठे अदभुत नगर आहे. या नगरीची प्रेम करण्याची शक्तीच फार मोठी. नांदेड माझ्या आणि मी नांदेडच्या प्रेमात पडलो. तो जन्मभराचा ऋणानुबंध आज पंचवीस वर्षे चालू आहे. मी नांदेडला आलो आणि अण्णासाहेब गुंजकरांच्या सहवासात