पान:वाटचाल (Vatchal).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रभावती कुरुंदकर


स्वत:च्या पत्नीवर ती हयात असताना लिहिणे अतिशय कठीण आहे. हे लिखाण ती वाचणारच हे माहीत असताना लिहिणे तर अधिकच कठीण आहे. शॉ ने एके ठिकाणी असे मत दिले आहे की, पत्नी हयात असताना खरे बोलणे शक्य नाही. आणि खोटे बोलण्याची इच्छा नाही, म्हणून मी पत्नीवर लिहीत नाही. सत्याचा एक अंश हा आहे. पुरुषजातीची ही शुद्ध लबाडी आहे. कारण बायकोमाघारी काहीही लिहिले तर खोटे काय हे सांगण्यास ती बिचारी नसते. वाटेल ते लिहिण्यास पुरुष मोकळा, असे सौ. प्रभावतीवाई कुरुंदकर यांचे मत आहे. सत्याचा अजून एक अंश हा आहे. 'ललित'च्या संपादकांचे पत्र जेव्हा मी बाईसाहेबांना दाखवले तेव्हा

त्यांची आद्य प्रतिक्रिया अशी, "नाही म्हणून सांगा. आता पोरे मोठे झाली. जावई आले. आपलेच प्रेम चघळीत जगासमोर ठेवण्याची वेळ आहे का हीं ? संपादकाला पोच नसतो. तुम्ही थोडे शुद्धीवर रहा." सत्याचा एक अंश हाही आहे. तरीही मी तिला चोरून महाविद्यालयात बसून हे लिहीत आहे. तेव्हा सांगेन ते खरे सांगेन, खोटे सांगणार नाही, पण सगळेच सांगणार नाही, हे सूत्र समोर ठेवतो.
सौ. प्रभावतीबाई कुरुंदकर यांना आमच्याकडे मी सोडून सर्वजण प्रभा म्हणतात. मी फक्त 'अग' म्हणतो. या पोरीची माझी पहिली भेट तिच्या राहत्या घरी खिडकीत उभी असताना झाली. माझे शिक्षण मामांच्याकडे हैद्राबाद येथे झाले. डॉ. नारायणराव नांदापूरकर हे