पान:वाटचाल (Vatchal).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रभावती कुरुंदकर : ४३

मराठवाड्यातील विद्वान प्रस्थ होते. ते माझे मामा. त्यांचे जिवलग मित्र रामचंद्रराव दुसंगे हे मॅट्रिक ट्रेंड शिक्षक. त्यामुळे दोन्ही घरची सर्व मंडळी सतत एकमेकांकडे जात-येत असत. प्रभा ही दुसंगे यांची क्रमांक दोनची मुलगी. माझ्या आईच्या आठवणीप्रमाणे मी पाच-सहा वर्षांचा असताना आई भावाकडे माहेरवासासाठी आली होती. त्या वेळी प्रभाला तिने कडेवर घेऊन खेळवले होते. त्या वेळी ती दीड दोन वर्षांची होती. सासू-सुनेची भेट अशी जुनी आहे. मी वयाच्या नवव्या वर्षापासून मामांच्याकडे होतो. दुसंगे यांच्या घरी अनेकदा जात-येत असे. पण मला या खिडकीतील भेटीपूर्वी तिला कधी पाहिल्याचे आठवत नाही. पहिली ठळक आणि पुसली न जाणारी भेट जांवाच्या वाड्यातील खिडकीमधली. आश्चर्य हे की तिलाही यापूर्वी कधी मला पाहिल्याचे आठवत नाही. या पहिल्या भेटीच्या वेळी मी अठरा वर्षांचा होतो. प्रभा चौदा वर्षांची होती. दोघांचेही वाढदिवस एकाच दिवशी येतात.
 लहानपणापासून मी मित्रमैत्रिणींच्या मेळाव्यात वावरणारा माणूस. आजही हा घोळका भोवती आहेच. प्रभा माझी विवाहापूर्वीची मैत्रीण नव्हे, पण जिच्याशी लग्न करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली ती ही पहिली मुलगी. या इच्छेनुसार लग्न झाले. या घटनेला पंचवीसहून अधिक वर्षे उलटून गेली, पण या मुलीशी आपण लग्न केले, याचा अजून पश्चात्ताप झालेला नाही. उद्याची हमी कोण देणार? ('अहो, त्यांना कशाला पश्चात्ताप होईल ? भोगावे लागते मला. मला विचारा!' ही सौ. ची प्रतिक्रिया असते.)
 या प्रथम भेटीच्या वेळी मी कसा होतो? इंटर नापास. नुकताच कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून चौदा दिवस कच्ची कैद भोगून आलेला. हैद्राबाद मुक्तीआंदोलनातील विद्यार्थी नेता. नवोदित राजकीय कार्यकर्ता म्हणून व वक्ता म्हणून मी ओळखला जाई. प्रियकराचे चित्र फारसे चांगले नव्हते. पायांत वहाण नसे म्हणून धूळ भरलेले पाय. डोके तुळतुळीत. केस नसत. लांब नाकाच्या शेंड्यापर्यंत येणारी प्रिय शेंडी, हाफ पँट आणि एक शर्ट. या जगात माझ्या आईखेरीज मला कुणी गोरा म्हटलेले नाही. स्वभाव रागीट, उग्र, वावदूक. प्रियकराचे हे चित्र आकर्षक नाही हे मला कळते, पण सत्य हेच आहे. प्रभावती सातव्या वर्गात होती. शाळेला जाताना परकर असे. घरी भावांचे शर्ट व हाफ पँट असे. प्रथम भेटीच्या वेळी ती हाफपँटमध्येच होती. 'प्रभा गोरी व नाजूक आहे,' असे आमच्याकडील सर्वाचे मत आहे. मात्र हे गोरेपण देशस्थांचे. कोकणस्थांचे नव्हे. पहिल्या भेटीतच ती मला आवडली. मीही तिला आवडलो. ह्याला प्रथमदर्शनी प्रेम म्हणायचे असेल तर माझी हरकत नाही. आम्ही एकमेकांना आवडलो याचा पुरावा काय ? मी हसलो, ती हसली. ती एक कच्चा पेरू खात होती. मी खुणेने तो मागितला. तिने खिडकीतून