पान:वाटचाल (Vatchal).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मामा : रामचंद्र राव नांदापूरकर : ३५

मन. पण जुनी बाई कधी नुसती आपल्या नवऱ्याची बायको होत नसे. ती सगळया कुटुंबातली एक व्हायची. सासू-सासरे, दीर-भाचे, नणंदा-जावा आणि नवऱ्याचे सगळेच नातेवाईक हे आपले भावकी आहेत. ते आपले गणगोत आहे. कोणी तिऱ्हाईत, परके नाहीत, या जाणिवेने आपोआपच माणसे कुटुंबवत्सल होतात. पतीच्या सहवासात मामी हळहळू देशाविषयी विचार करायला शिकल्या. आपणही स्वातंत्र्यासाठी काही केले पाहिजे अशी त्यांच्या मनाची तयारी झाली. दादांनी इच्छा व्यक्त करताच त्या सत्याग्रहालासुद्धा तयार झाल्या. या सत्याग्रहाच्या तयारीत आणि प्रत्यक्ष सत्याग्रह करण्यात सध्या पीपल्स कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका असणाऱ्या सौ. ताराबाई परांजपे यांचाही भाग फार मोठा होता. दादांनी इच्छा व्यक्त केली होती. मामींचीही सत्याग्रह करण्याची इच्छा होती, पण ही कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरवायची म्हणजे अनेक अडचणी होत्या. माझ्या मोठ्या मामांना सत्याग्रहाची कल्पना अजिबात मान्य नव्हती. सत्याग्रहाची जागा व वेळ ठरवावयाची आणि मोठ्या दिराला पत्ता लागू न देता सत्याग्रह करायचा ही अवघड गोष्ट होती. शिवाय सत्याग्रह करायचा म्हणजे घरची काही सोय करायला हवी. सोनेदागिने, भांडी यांची व्यवस्था करायला हवी. आपला एक मुलगा आणि दोन मुली यांना कूठे सोडावयाचे ? शेवटी मुले-बाळे दिराकडे सोपवावी लागणार. या मुलाबाळांना समजावून सांगावे लागत असते. मुलांच्या मनाची तयारी करायची ती पुन्हा वडीलदिराला चोरूनच करावी लागते. या सगळ्याच उद्योगात ताराबाई परांजपे यांचा वाटा मोठा राहिला. मामींनी सत्याग्रह केला ही त्यांची जेलयात्रा त्यांना सुखाचीच ठरली.
 पूर्वी व्हायचे काय, की, दादा जेलमध्ये जायचे आणि मामी उपास-तापास करीत नवरा परत कधी येतो याची वाट पाहत थांबायच्या. या वेळी असे नव्हते. या वेळी तुरुंगात पती-पत्नी दोन-तीन महिने एकत्र होते. राजकारणाचा डाव म्हणून नोव्हेंबरअखेर काही ज्येष्ठ राजकीय नेते सुटले. त्या वेळी दादांच्याबरोबर मामीही सुटल्या. पण आता त्या कार्यकर्त्या झालेल्या होत्या. त्यामुळे भूमिगत आंदोलनाचे नेतत्व करण्यासाठी दादा बाहेर गेले. त्यांच्यावरोवर मामीही गेल्या. जानेवारीपासून पुढे काही महिने मामी सशस्त्र आंदोलनातल्या कार्यकर्त्या होत्या. याही वेळेला या सर्व भूमिगत, सशस्त्र आंदोलनाच्या कार्यात ताराबाई परांजपे मामींच्या बरोबर होत्याच. पोलिस ॲक्शन होईपावेतो हे राजकीय जीवन टिकले. यानंतर दादांनीच राजकारण सोडले, मामींनीही सोडले.
 रामाची सीता म्हणून त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. रामाची सीता म्हणूनच त्यांनी आपल्या जीवनातील सर्व सुखदुःखे व वनवास भोगला. हा आपला विलक्षण पती, त्याच्या सर्व इच्छा व लहरी सांभाळून आपल्याकडून तो फुलासारखा