पान:वाटचाल (Vatchal).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३४ : वाटचाल

वाटयाला आले. हट्टीपणा, रागीटपणा, चिडखोरपणा हे जे दादांचे स्वभावगुण, त्याचा सर्वांत मोठा त्रास झाला असेल तर तो सीतामामींना ! लहानपणी आठव्या वर्षी लग्न झाले. त्यानंतर नवरा शिकण्यासाठी औरंगाबादला, वडील-भावाकडे. पती-पत्नींची भेट व्हायची म्हणजे अशीच सुट्टीत. नवऱ्याचे शिक्षण झाले, आता आपण संसार मांडू ही स्वप्ने पाहावीत तो नवरा सत्याग्रह करून तुरुंगात. संसार थोडासा मांडावा, थोडी स्थिरता यावी तो नवरा पुन्हा तुरुंगात. या पतीच्या ध्येयवादाचा सर्वात मोठा त्रास झाला असेल तर तो पुन्हा सीतामामींनाच. असल्या प्रकारचे आयुष्य मोठ्या कष्टाने व जिद्दीने सीतामामींनीच रेटले. पण त्यांच्या चरित्रात पाहावे तो सगळी नवऱ्याविषयीची भक्ति भावनाच ओसंडून वाहताना दिसेल. या एवढ्या मोठ्या प्रेम आणि भक्तीची काही ठळक महत्त्वाची कारणे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. तशा मामी देवाधर्मावर श्रद्धा असणान्या धार्मिक. दादा वजा जाता आमचे सगळे आजोळच श्रद्धावान स्त्री-पुरुषांनी भरलेले आहे. सीतामामीही या श्रद्धाळू आणि धार्मिक पिढीतल्याच म्हटल्या पाहिजेत.
 आपण अलीकडे 'पती-पत्नी प्रेम' असा शब्द वापरतो. या शब्दप्रयोगात पतीला पत्नी आवडणे, पत्नीला पती आवडणे, त्या दोघांचे मनोमीलन होणे इत्यादी बाबी गृहीत धरलेल्या असतात. जुन्या पिढीतल्या स्त्रीसमोर असा कोणता प्रश्न नसे. आठ-नऊ वर्षांची होताच तिचे लग्न होऊन जाई. तारुण्यउदयाच्या काळी तिचा पती, प्रियकर ठरलेला असे. हा पती नुसत्या प्रेमाचे स्थान घेत नसून तो भक्तीचे व निष्ठेचे स्थान घेत असतो. ही भक्ती व निष्ठा सांभाळणे हेच कुलवंत स्त्रीचे काम आहे, ते तिचे कर्तव्य आहे, अशी संस्कृतीची मनात रुजलेली जाणीव असे. तो मनाचा धर्म असे. पती रागावला तरी तो आपलाच आहे. चूक आपली असो, की त्याची असो, मनधरणी करणे आपले कामच आहे, असे गृहीत धरूनच या पिढीतल्या स्त्रिया वागत. पतीविषयी काही वावगा विचार आपल्या मनात येणे हेसुद्धा पाप मानले जाई. हा पती जर विद्वान, बुद्धिमान आणि कर्तबगार असला, तर मग त्याच्याबरोबर कोणतेही कष्ट सहन करणे यात कधीच त्या पिढीतल्या स्त्रीला कशाची फिकीर वाटली नाही. मी नवऱ्याची आहे आणि नवरा माझा आहे या एका जाणिवेसमोर सर्व दुःखे थिटी होत असत. रामाच्याबरोबर सगळे सोडून सुखाने वनवासाला निघणारी रामायणाची नायिका सीता, ही काही नुसती कल्पनेतली नाही. नवऱ्याचे चारित्र्य आणि त्याचा भलेपणा याची खात्री असणान्या जुन्या पिढीतल्या शेकडो, हजारो बायका अशाच राहत आल्या. त्यात आपण काही मुलुखावेगळे विलक्षण वागतो आहोत असे त्यांना कधी वाटले नाही.
 आमच्या मामी म्हणजे कुटुंबवत्सल स्त्री. मी, माझा नवरा आणि माझी मुलेबाळे यांच्यासह सुखाने संसार करावा एवढी माफक अपेक्षा बाळगणारे त्यांचे