पान:वाटचाल (Vatchal).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभिवादन : २७

स्वागत करण्याइतके मन उदारही आहे. पण हा संग्रह छापताना प्रकाशकांची भूमिका चांगला काव्य ग्रंथ छापण्याची नाही. ऋणमुक्तीची आहे. या पुस्तकाचे वाङमयीन मूल्यमापन कसेही होवो- आणि तेही अनुकूलच होईल असे मला वाटते-पण कसेही होवो- नांदापूरकरांचा चाहतावर्ग या संग्रहाचे स्वागत करील. अशा या संग्रहाच्या प्रारंभी, नांदापूरकरांच्या परंपरेचा एक छोटासा पाईक म्हणून, अभिवादन करताना अण्णांचे दर्शन घेणे, त्यांचे गुणसंकीर्तन करणे व हे करण्यास संधी मिळाल्याबद्दल स्वतःस धन्य मानणे मला अधिक महत्त्वाचे वाटेल.