पान:वाटचाल (Vatchal).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२६ : वाटचाल

मराठवाड्यात मराठीचे प्रचंड प्रेरणास्थान होते. मराठवाड्यातील तरुण पिढीच्या सर्व मराठी अभ्यासकांचे ते श्रद्धास्थान होते. त्यांनी ओव्या गोळा करण्याचा ध्यास घेतला तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी शिष्यमंडळींनी लाखो ओव्या गोळा केल्या. अण्णांच्या संग्रहात पुनरुक्ती वजा जाता लाखावर ओव्या होत्या. या ओव्या सर्व मराठवाड्यातून, सर्व थरांतून व बहुतेक सर्व जातीजमातींतून आलेल्या होत्या. माझी आठवण बरोबर असेल तर सर्व ओव्या एकूण १३८ जाती-पोटजातींच्या बायकांचे धन होत्या. सर्वांनीच हे काम काही ओव्यांच्या प्रेमाखातर केलेले नाही. ते बहुशः अण्णांच्या प्रेमाखातर केलेले आहे. एवढे मोठे श्रद्धास्थान व एवढे मोठे प्रेरकत्व त्यांच्याजवळ होते. या त्यांच्या विराट दर्शनापुढे आम्ही नतमस्तक होतो. मग अण्णांचे सारे दोष, त्यांच्या साऱ्या उणिवा व त्यांनी प्रसंगी दिलेल्या शिव्यासुद्धा मधुर होऊन मनात तरंगतात. क्षणभर माझा बुद्धिवाद कोपऱ्यात पडतो व मी रोमांचित होतो.
 अण्णांच्या कवितासंग्रहाला प्रास्तविक लिहिताना काव्याविषयी फारसे काही मी बोललोच नाही. कारण कवी म्हणून अण्णांचे मूल्यमापन करणे मला शक्य नाही. मराठवाडयात अगर अधिक नेमकेपणाने सांगायचे तर जुन्या हैद्राबाद राज्यात दोन माणसे अशी होती की, ज्यांचे वाङमयीन मूल्यमापन आम्हाला कधी करावेसे वाटले नाही. पैकी एक अण्णा होते. दुसरे रावसाहेब र. लु. जोशी होते. कवी म्हणून अण्णांची कविता चांगली असेल. मला स्वतःला ती कविता आवडते. कदाचित अण्णांची कविता अगदीच सामान्य असेल. अनेकांना ती आवडणार नाही. काही अधिक चिकित्सक या कवितेवर बालकवींचे (पृष्ठ ३, ५, १२), विनायकांचे (पृष्ठ ९, ९९), टागोरांचे (पृ.१४, १६) खलिल जिब्रानचे (पृष्ठ ६८), तांब्यांचे (पृष्ठ ३६, ४२) ठसे दाखवू शकतील. रविकिरण मंडळातील जानपदगीतांचे, सुनीतांचे अगर ओवी-वाङमयाचे ठसेसुद्धा दाखवणे कठीण नाही. पण असे ठसे दाखविले म्हणजे काम संपत नाही. हे ठसे असूनही काव्य आवडू शकते. " लेकी चंद्र ज्योति । तुझ्या रूपाचा अस्करा । वेला लावून वाफ्यात । जाई शेजारी मोगरा" || या ओळी वाचताना ओवी- वाङमयाची आठवण होतेच होते. पण अशी आठवण होते म्हणून या ओळींची गोडी संपत नाही. सारेचजण काही एकूण वाङमयप्रकाराला आपल्या पृथगात्मतेने नवे वळण लावणारे युगप्रवर्तक कवी नसतात. तसे नांदापूरकर होते असा माझा दावा नाही. ते तसे नव्हते याबद्दल फारसे वाईटही वाटत नाही. मुळात अण्णांची कविता चांगली आहे की वाईट आहे हा प्रश्नच मला अप्रस्तुत वाटतो. ज्या दिवशी वाङमय-विवेचन करण्यासाठी मी उभा राहीन त्या दिवशी ममत्वाचे पट डोळ्यांवर येऊ न देता मूल्यमापन करावे लागेल. तसे करण्याची माझी तयारी आहे, किंबहुना, अशा मूल्यमापनाचे मोकळेपणाने