पान:वाटचाल (Vatchal).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२० : वाटचाल

दोन पैसे वाया गेले यामुळे ते एकदम चिडत, हळहळत. आम्हांला पैशाचे महत्त्व सांगत. दोन पैसे ही रक्कम लहानसान नव्हे, हे तत्त्व जो जो पोटतिडकीने अण्णा सांगत तो तो आम्हाला वाटे, हा माणूस अत्यंत कंजूष आहे. जसजसा पुढे मी मोठा झालो, व्यवहाराची अक्कल आली, तसतसे माझे मन अण्णांच्या विषयीच्या आदराने भरून गेले. आजही अण्णांची आठवण झाली म्हणजे मन उचंबळून येते. या माणसाने जन्मभर पैशाची चिंता केली. आपण फाटके नेसला. मुलांना फाटके नेसवले.आपल्या हौशी मारल्या. बायकोच्या हौशी मारल्या. आयुष्यभर ही झीज सहन करीत संसार केला. पण आईकडच्या, बापाकडच्या, किंबहुना मित्रांच्या व गावाकडच्या शक्य त्या सर्वांचे, त्यांना आपल्या घरी आणून शिक्षण केले. या शिकून गेलेल्या मंडळींच्याकडून अण्णांना कधीही पैची अपेक्षा नव्हती. अण्णा मनाने उदार होते. कृतीने उदार होते. भाषेने मात्र अत्यंत चिक्कू माणसासारखे सदैव ते बोलत.
 माझ्यावर अण्णांची विलक्षण माया होती. माझ्या जीवनाच्या अपयशाने ते व्याकुळ होत. यशाने उल्हसित होत. कासवीच्या डोळ्यांत अमृतकळा असते असे म्हणतात तसे कहीतरी अण्णांच्या नजरेत होते. त्या सावलीत आम्ही वाढलो. मी दहाअकरा वर्षांचा होतो, त्या वेळी अण्णांचा प्रबंध लिहिणे चालू होते. मुक्तेश्वर आणि मोरोपंत या विषयांचा त्यांचा गहन अभ्यास, पण ते माझ्याशी चर्चा करीत, आपले मत कसे बरोबर आहे हे मला पटवून देण्याचा प्रयत्न करीत. सातवी-आठवी उर्दू माध्यमातून शिकणारा मी मला मोरोपंत काय कळणार? मोरोपंतांच्या क्लिष्ट भाषाशैलीमुळे त्याचे इतर सर्व गुण रद्द होत, असे मी म्हणे; कारण आम्हांला मोरोपंत समजतच नसे. पण अण्णा तळमळीने मुद्दा पटवून देत. या प्रबंधाचा अतिशय बारीक परिचय त्यामुळे झाला. अण्णा विलक्षण जिद्दीचे होते. त्यांना टाइप करता येत नसे. पण दोन बोटांनी अक्षरे हुडकून टाइप करीत. हा प्रचंड प्रबंध त्यांनी टाइप केला. याआधी अगर यानंतर टाइप करताना ते कधी दिसले नाहीत. पृष्ठाला बारा आणे देणे त्यांना परवडणारे नव्हते. पगार २५० रुपये असला तरी खाणारी तोंडे १३-१४ होती. मग परिस्थितीवर मात करणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे अण्णांची जिद्द. ही जिद्द अण्णांचा लक्षणीय विशेष होता. आणि माझ्यावरचे अलोट प्रेम हा त्यांच्या जीवनातला अतिशय दुबळा बिंदू होता. मी फार मोठे व्हावे असे त्यांना वाटे. इतरांना परिचय करून देताना माझा उल्लेख ते नेहमी ' आचार्य' असाच करीत. पण शेवटी आम्ही मोठे होणार होणार म्हणजे किती होणार ? मुळातच जिथे आवाका बेतास बात आहे तिथे फार उंच उडी घेणार कुठून ? काहीतरी नेत्रदीपक माझ्याकडून घडावे असे त्यांना फार वाटे.
 अण्णांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता. या प्रेमापोटी विलक्षण हळवेपणा त्यांच्यात आलेला होता. पण ते बोलत अतिशय तीव्र आणि तुटक. त्यामुळे त्यांचा