पान:वाटचाल (Vatchal).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभिवादन : १९

तुझे लहानपण संपले पाहिजे. थोडे घरसंसाराकडे लक्ष दिले पाहिजे." या वेळी अण्णांचे वय १४-१५ वर्षांचे असेल. स्वाभाविकच बापाची इच्छा मुलाने ' उमेदवार' व्हावे; अहलेकार, पेशकार अशा क्रमाने चढत जावे; पेन्शनीच्या जवळपास नायब तहशीलदारी मिळाली म्हणजे स्वर्गाला हात टेकले; अशी असावी. मला आजोबा चांगले आठवतात. मी त्यांना पाहिले, त्या वेळी ते खूपच थकलेले होते. आपली मुले शिकून मोठी झाली याची त्यांना नेहमी धन्यता वाटत असे. पण याचे श्रेय खरे तर अण्णांच्या जिद्दीला दिले पाहिजे. शिकण्याच्या जिद्दीमुळे अण्णा हैद्राबादला आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, कधी वार लावून, कधी इतरांच्याकडे राहून, शिकवण्या- नोकऱ्या करीत, त्यांनी मॅट्रिक तर एकदाचे काढले. उस्मानिया विद्यापीठ त्या वेळेला नुकतेच सुरू झालेले होते. कॉलेज शिक्षणासाठी अण्णा या विद्यापीठात प्रविष्ट झाले. व्यायामाची त्यांना दांडगी हौस असे. सकाळी ते जोर मारीत. संध्याकाळी कुस्त्याही खेळत. त्यांच्या भाषेत सांगायचे तर दोन वेळेला रगडून जेवत. दोन-अडीच भाकरी, चांगल्या जाड, हातावरच्या, आणि मग पोटभर पोळ्या. वर्गात वसले की, त्यांना झोप येई. एक-दोनदा अण्णा मला म्हणाले, " माझ्या कॉलेज जीवनात सतत पन्नास मिनिटे मी वर्गात जागा राहिलो असा प्रसंग फक्त एकदाच आला. त्या वेळी सतत दोन दिवस मला कुठे जेवणासच मिळाले नाही." कसेबसे दिवस काढीत अण्णा बी. ए. झाले व नंतर औरंगाबादला शिक्षक झाले. त्या काळच्या पिढीत अण्णांच्याजवळ शिक्षणाची जिद्द फार मोठी होती. ते स्वतः शिकले. आपल्या भावांना शिकवले. आपल्या नातेवाइकांचा एक मोठा मेळावा त्यांनी घरी गोळा केला आणि अण्णा सर्वांना शिकवीत बसले. वयाच्या नवव्या वर्षी बहिणीचा पोर म्हणून त्यांच्या घरी जेव्हा मी दाखल झालो त्या वेळी सगळे मिळून अण्णांच्या घरी आम्ही चौदाजण होतो. अण्णांना पैशाचा व्यवहार कधीच जुळला नाही. फारसा पैसा आयुष्याच्या अखेरपर्यंत कधी त्यांच्या हाती आला नाही. जो आला त्यात टापटिपीने कधी संसार बसला नाही. आपण, आपली बायको, आपली मुले-बाळे असे अण्णा राहिले असते तर अडचणीचे कारण नव्हते. पण त्यांनी सारे नातेवाईक गोळा केले. याच्या परिणामी अण्णांचा संसार नेहमी ओढघस्तीचा राहिला. वयाच्या नवव्या वर्षी मी मामाच्या घरी आलो आणि माझे पहिले मत असे बनले की, अण्णा कमालीचे कंजूष व चिक्कू गृहस्थ आहेत. कारण ते नेहमी खर्चावर तक्रार करावयाचे. अण्णांना पान-तंबाखूचे चांगलेच व्यसन होते. गोविंदराव पानवाल्याकडून आम्ही पान आणीत असू. एका वेळी तीन-चार विडे आम्ही आणीत असू. कित्येकदा अण्णा तोंडात विडा घालायचे व मामी आतून सांगायच्या 'चला जेवायला. वाढलेले आहे.' अण्णांना अशा वेळी अत्यंत दुःख होत असे. तीन पैशाच्या पानातील एक पैसा वसूल झाला. आता पान थुकावे लागणार,