पान:वाटचाल (Vatchal).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभिवादन : २१

स्वभाव कधी कधी प्रेमशून्य, निर्दय असा वाटे. माझे सासरे एकदा घरी आले. अण्णांचा लाडका कुत्रा अंगणात हुंदडत होता. तो माझ्या सासऱ्यांना कडाडून चावला. 'अरे अरे' म्हणत अण्णा पुढे गेले आणि नंतर म्हणाले, " मूर्ख आहेस, बेटया, कमावलेल्या शरीराचा चावा घेऊ नये. तुझे दात दुखावतील !" माझे सासरे अण्णांचे बालमित्र होते. त्यांना त्याचे काही वाटले नाही. इतर कुणी असता तर म्हणाला असता, 'काय निर्दय माणूस हो ! चावऱ्या कुत्र्याच्या दातास दुःख होईल याचीच हा काळजी करतो. याच्या तोंडून सहानुभूतीचा एक शब्दही बाहेर पडत नाही.' पण हे दिसणारे अण्णांचे चित्र खरे नव्हते. अण्णा तोडून बोलत, कुचकेनासके, वाकडे-तिकडे बोलत. माझ्या एका मित्राने ऐच्छिक उर्दू घेतले. ते अण्णांना अजिबात पटले नाही. ते म्हणाले, " वाऽऽ ! आपल्या पितरांचे चांगले पांग फेडलेस. तुमच्या बेचाळीस पिढया जन्नतमध्ये तृप्त झाल्या असतील." माझ्या मित्राने उर्दू सोडले व मुकाट्याने मराठी घेतले. या बाबी अण्णांना ओळखणारी सर्व माणसे सांगतील. प्रत्येकाला ते असे तोडून बोलत. मी एकूण बारा वर्षे त्यांच्या घरी काढली. आठवड्यातून किमान दोन-तीनदा तरी ते मला सांगत, अगदी आवर्जून मलाच सांगत, " बाबा रे ! पाचजण कृतघ्न असतात, अशी परंपरा आहे. पहिला जावई, दुसरा साप, तिसरा अग्नी, चौथा दुष्ट आणि पाचवा सर्वश्रेष्ठ कृतघ्न म्हणजे बहिणीचा मुलगा." हे ऐकता ऐकता आम्हांला सवय होऊन गेली. अण्णांच्या रागीटपणाच्या, वाकड्या बोलण्याच्या आठवणी सर्वांना आहेत. पण अण्णांच्यावर विद्यार्थ्यांनी अलोट माया केली. विद्यार्थ्यांचे प्रेम प्रचंड प्रमाणात संपादन करणारे ते भाग्यशाली प्राध्यापक होते. एक-दोन वेळेला सर्वांना राग येई, हळूहळू या बोलण्याची सवय होई आणि त्यांच्या वत्सल मायेत सर्वजण मनसोक्त स्नान करीत. आमच्यासारखे काही धटिंगण तर त्यांचीही चेष्टा करीत. अण्णांच्याइतका वत्सल माणूस पाहण्यास क्वचित मिळतो. कुणाचेही दुःख पाहून ते व्याकुळ होऊन जात. आपल्या विद्यार्थ्यांवर त्यांची विलक्षण माया असे. कहाळेकरांना अगर भगवंत देशमुखांना अण्णा सदैव वाकडे बोलत. पण इतर कुणी थोडेही कमी-जास्त बोललेले त्यांना सहन होत नसे. स्वतःसाठी कधीही दीन न झालेले ताठर आणि अहंकारी नांदापूरकर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अतिशय दीन व गरीब होऊन प्रयत्न करताना मी पाहिले आहेत. साधे आम्ही सिनेमाला गेलो तर परत येईपर्यंत त्यांना झोप येत नसे. आमची आजारीपणेही त्यांनीच सोसली आहेत. तीन-तीन चार-चार दिवस जाग्रणे करीत ते आमच्या उशाशी बसत; प्रकृती चांगली झाल्यावर सूड घेऊ म्हणून आम्हांला शिव्या देत. दिसायला अण्णा देखणे होते. अतिशय गोरेपान नाकी-डोळी धरधरीत, आरोग्यसंपन्न व रूबाबदार असा त्यांचा चेहरा दिसे. थोडा
 बा...२