पान:वाटचाल (Vatchal).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१६ : वाटचाल

सांगीन, तू तात्पर्य सांग." मी म्हटले, " ठीक आहे." त्यांनी मला समुद्रमंथनाची गोष्ट सांगितली. महाभारतातील गोष्ट. तुम्हाला माहीत आहे का ती? एकदा काय झाले, देव आणि राक्षस जमले. समुद्र घुसळायचा, असे ठरले. मग मंदराचल पर्वताची केली रवी. वासुकी सर्पाचा केला दोर. देव सापाला शेपटाकडून व राक्षस त्या सापाला डोक्याकडून आणि मग समुद्र घुसळायला झाला आरंभ. त्या समुद्रमंथनातून क्रमाने रत्ने निघू लागली. चंद्र, धन्वंतरी, सात तोंडांचा उच्चैःश्रवा नावाचा घोडा, अशी बारा रत्ने निघाली. ती देवाने घेतली. मग हलाहल निघाले; ते शंकराने प्राशन केले. मग अमृत. अशी ती सगळी कहाणी आहे... काकासाहेबांनी ती मला नीट घोळून रंगवून सांगितली. मी ऐकली... ते म्हणाले, “बाळ नरहरी, आता या गोष्टीचे तात्पर्य सांग बरे."
 मी म्हणालो, " तात्पर्य फार सोपे आहे. देव लबाड असतात, म्हणून त्यांचा फायदा होतो. तात्पर्य, राक्षसाप्रमाणे भोळे नसावे, नुकसान होते ; देवाप्रमाणे लबाड असावे. फायदा होतो."
 काकासाहेब जोशी भयंकर रागावले ! ते म्हणाले, " असे असते काय तात्पर्य ? मूर्ख नाही तर ! चल, ऊठ इथून !" मी म्हटले, "हे पहा जोशीसाहेब, मला मूर्ख म्हणण्याआधी तुम्ही दुसरे चांगले तात्पर्य सांगा. माझी चूक सांगा!" पण जोशीबुवांना रागच फार फार आला होता. ते म्हणाले, " असे पापी विचार मनात येणाऱ्या मुलाशी बोलायला मला वेळ नाही."
 माझ्या वडिलांना यातले काहीच माहीत नव्हते. काकासाहेब बोलले नाहीत. मीही बोललो नाही. माझे मामा नारायणराव नांदापूरकर हे काकासाहेबांचे विद्यार्थी. तेही मोठे धार्मिक होते. काकासाहेबांनी माझी तक्रार मामांच्याजवळ केली.
 दोन-तीन महिन्यांनी मी चौथी पास झालो आणि पाचवी शिकण्यासाठी मामांच्याकडे हैद्राबादला आलो. मामाही मोठे विद्वान. महाभारताचे अभ्यासू व प्रोफेसर होते. मी शिकायला हैद्राबादला आलो व चार-पाच दिवसांनी मामांनी मला समोर बसविले. ते म्हणाले, " नरहरी, मी तुला आता गोष्ट सांगतो. तू तात्पर्य सांग." मी म्हटले, "ठीक आहे." काकासाहेबांनी काय तक्रार केली, ते मामांचे गुरू, इत्यादी त्या वेळी मला माहीत नव्हते. मामांनी गोष्ट काळजीपूर्वक निवडली होती... काश्यप मुनी होते. त्यांना बायका दोन. एक होती सरळसाधी. तिचे नाव विनता. दुसरी होती आतल्या गाठीची व लबाड. तिचे नाव कद्रू. सर्प आणि गरुडाची ही कहाणी आहे. या कहाणीत लबाड कद्रूचा आरंभी विजय होतो; पण शेवटी गरूड आपल्या आईला गुलामगिरीतून सोडवतो आणि लबाड कद्रूचा पराभव होतो... अशी ही गोष्ट. मामांची अपेक्षा होती की, मी तात्पर्य सांगावे : लबाडीचा जय पचत नाही: सत्याचा शेवटी जय होतो. मी नेमके हेच टाळले. मी